दाम्पत्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या डंपरमधून अवैध मुरूमाची वाहतूक : दोघांविरुद्ध गुन्हा
भुसावळ : लग्नासाठी बुलढाणा येथून भुसावळात आलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला डंपरने धडक दिल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, 4 डिसेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी पोलिस चौकशीत अपघाताता कारणीभूत ठरलेल्या डंपरमधील मुरूमाची चौकशी केली असता संबंधिताकडे गौण खनिज वाहतुकीचा परवाना नसल्याने बाजारपेठ पोलिसांनी डंपर चालक महेद्र ब्रिजलाल कोळी (रा.भोरटेक, ता.यावल) व डंपर मालक तुषार दशरथ फालक (रा. दिनदयाल नगर,भुसावळ) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. गत शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता डंपरने बुलढाणा येथील पती-पत्नीच्या दुचाकीला धडक दिल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. याअपघातास कारणीभूत असलेल्या डंपर (एम.एच.19 झेड.3291) मध्ये असलेल्या मुरूमाची विना परवाना वाहतूक होत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक गणेश धूमाळ यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तपास दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमाकांत पाटील करीत आहेत.

