भुसावळात निकृष्ट रस्ता कामांच्या तक्रारीनंतर मुख्याधिकार्यांकडून पाहणी
नगरविकास विभागाच्या कक्ष अधिकार्यांनी दिले रस्ता कामांच्या चौकशीचे आदेश
भुसावळ : भुसावळ शहरात पालिकेतर्फे सुरू असलेली रस्त्यांची कामे करताना पालिकेच्या स्थानिक अभियंत्यांनी साध्या भेटी सुद्धा दिल्या नसून अत्यंत निकृष्ट पद्धत्तीने रस्त्यांची कामे होत असल्याने या कामांचे पूर्ण निरीक्षण गुणवत्ता व संनियंत्रण समितीमार्फत करण्यात यावे, अशी मागणी तक्रारदार दिनेश शंकरलाल उपाध्याय यांनी करीत तो पर्यंत ठेकेदाराचे बिल अदा करू नये, अशी तक्रार थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, नगर विकास सचिव महेश पाठक, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच विधान परीषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी उदय ना.सारदार यांनी तक्रारीचे दखल घेवून अवलोकनार्थ आवश्यक ती कारवाई करून आपला स्वयंस्पष्ट अहवाल शासनास सादर करावा, असे आदेश मुख्याधिकार्यांना दिल्याचे उपाध्याय यांनी कळवले आहे.
मुख्याधिकार्यांनी केली रस्ता कामांची पाहणी
दिनेश उपाध्याय यांनी ठेकेदाराकडून निकृष्ट पद्धत्तीने एस.के.ऑईल मिल ते खडका चौफुली पर्यंतच्या रस्त्याचे काम करण्यात येत असल्याची तक्रार गत आठवड्यात शासन स्तरावर करण्यात आली होती व या तक्रारीच्या अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार यांनी पालिकेच्या पथकासह एस.के.ऑईल मिल ते खडका चौफुली पर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीत कुठलेही तथ्य नसून ही तक्रार निरर्थक असल्याचे मुख्याधिकारी यांनी यावेळी सांगितले. टाऊन प्लॅनिंगचे अभियंता यांच्यासह पालिका अधिकार्यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आल्याची माहिती चिद्रेवार यांनी दिली.

कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
शहरात काही महिन्यांपूर्वी मामाजी टॉकीज रस्त्याचे ट्रीमीक्स काम करण्यात आले होते व किमान 40 वर्ष हा रस्ता टिकणार असल्याची ग्वाही माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी त्यावेळी दिली होती मात्र अवघ्या सहा महिन्यात रस्त्याची दुरवस्था झाल्याने सत्ताधार्यांच्या कामासह गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला तर त्यानंतर जुना सातारा भागात सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या निकृष्ट कामाबाबत शिवसेना पदाधिकार्यांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकार्यांसह वरीष्ठ स्तरावर तक्रारी केल्याने शहरात होणार्या कामांच्या दर्जाबाबत एकूणच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
ठेकेदाराकडून नियमानुसार काम : मुख्याधिकारी
पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, तक्रारीच्या अनुषंगाने स्वतः मी पालिकेच्या पथकाने रस्ता कामांची पाहणी केली शिवाय तक्रारदाराशी संपर्क साधला मात्र ते बाहेरगावी असल्याने त्यांच्या कुटुंबियांना सूचित करण्यात आले. ठेकेदाराकडून नियमानुसार काम करण्यात येत असून या तक्रारीत कुठलेही तथ्य नसल्याचे चिद्रेवार म्हणाले.

