खडका शिवारात दारू भट्टीवर धाड : 38 हजारांचा मुद्देमाल जप्त
भुसावळ : तालुक्यातील खडका शिवारात मंगळवारी सायंकाळी तालुका पोलिसांनी छापा टाकत तीन लिटर तयार देशी दारूसह दारू बनविण्याचे कच्चे रसायन मिळून 38 हजार रूपयांचा माल जप्त केला. यातील संशयीत आरोपी पसार झाला आहे. तालुक्यातील खडका येथील एमआयडीसी परीरसरातील जंगलात गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाल्याने त्यांनी पोलिस कर्मचारी घेत मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास खडका एमआयडीसी परिसरातील जंगलात जात मिळालेल्या माहितीवर पाहणी केली असता, तेथे गावठी दारू तयार केली जात होती. यावेळी पोलिसांनी छापा टाकला असता, संशयीत जंगलात पसार झाला. पोलिसांनी घटना स्थळावरून 30 लिटर तयार गावठी दारू, 1 हजार 100 लिटर दारू तयार करण्याचे मिश्रण असा सुमारे 38 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील दारू तयार करण्याचे रसायन जंगलातच फेकून देण्यात आले. याप्रकरणी पोलिस कर्मचारी जितेद्र साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात अवैध दारू तयार करण्याबाबातचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, विठ्ठल फुसे, जगदीश पाटील यांनी केली.

