केळी फळ पीक विम्याचे निकष गत वर्षाप्रमाणेच कायम ठेवावेत
कृषी आयुक्तांच्या ऑनलाईन बैठकीत केळी उत्पादकांचा सूर
रावेर : पुणे येथील कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्यासोबत केळी उत्पादकांची पीक विम्यातील निकष सुधारण्यासंदर्भात ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीत केळी उत्पादक शेतकर्यांनी 2019 च्या निकषांमध्ये मागील 10 वर्षांपासून हवामान तज्ञ व अधिकार्यांच्या माहितीतून निकष ठरविण्यात आले असून तेच निकष कायम ठेवण्यबाबत आग्रह धरला. याबाबतच्या तक्रारी व चर्चा करण्यासाठी जळगाव जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात कृषीआयुक्त,कृषी संचालक व केळी उत्पादक अशा ऑनलाईन बैठकीचे नियोजन करण्यात आले
पंचनाम्याची अट रद्दची मागणी
या बैठकीत काही वेळा आवाजाची स्पष्टता समजत नसल्याने ऑनलाईन बैठकीपेक्षा जिल्ह्यातील 30ते 40 केळी उत्पादक शेतकर्यांसोबत आयुक्त व संबंधित अधिकार्यांनी प्रत्यक्ष बैठक घेण्याबाबत जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील यांनी सांगितले तर वादळाची किंवा वार्याच्या वेगासाठी पंचनाम्याची अट रद्द करावी व ताशी 20 किमी वेगावर ही विमा मंजूर करावा, अशी मागणी फळबागायतदार संघाचे अध्यक्ष रामदास पाटील यांनी केली. मागील वर्षाच्या मंजूर विमा रकमेपैकी अजून ही काही शेतकर्यांची रक्कम विमा कंपनीने खात्यात टाकली नसून त्याबाबतची चौकशी करण्याची मागणी निंभोरा येथील सुनील कोंडे यांनी आयुक्तांकडे केली. याबाबत काही तक्रारी असून चौकशी करण्याची ग्वाही धीरजकुमार यांनी दिली. फळपीक विमा योजनेतील बदलांबाबत मागील वर्षाचे निकष कायम ठेवण्याबाबत व विमा कंपनी उशिरा पेमेंट देत असल्यास 50 दिवसांचे व्याज ही त्यांनी द्यावे, अशी मागणी तांदलवाडी येथील शशांक पाटील यांनी केली. रावेर येथून ऑनलाईन असलेले विशाल अग्रवाल यांनी निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी अतिथंडीमुळे किंवा अति उन्हामुळे अडचणी येत असून निर्यातक्षम केळी बागांसाठी विम्याची मदत होईल, असे निकष देण्याचे सांगितले. केंद्र सरकारच्या दुप्पट उत्पन्न धोरणाऐवजी निम्मेच उत्पन्न शेतकर्यांना होत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.गणपूर, ता.चोपडा येथील एस.बी.पाटील यांनी या फळपीक विम्याच्या इतर कंपनीऐवजी राज्य सरकारने स्वतःची कंपनी स्थापन करावी व राज्याचा हिस्सा त्या कंपनीला द्यावा, अशी सूचना केली. धरणगाव येथील डॉ.सत्वशील पाटील यांनी या विमा योजनेत काही बदल असलेले निकष कृषी आयुक्त कार्यालयास मेल करून पाठविल्याचे सांगितले. ऐनपूर येथून ऑनलाईन जुळलेले केली उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील यांनी मागील ऑनलाईन बैठकीचा वृतांत देत मागील निकषाबाबत आग्रह ठेवला. बलवाडी येथून अमोल पाटील यांनी विमा कंपनीच्या नफ्याचे गणित सांगत जुन्या निकषात ही विमा त्या कंपन्यांना परवडत असल्याचे सांगितले. ऑनलाईन बैठकीत बर्याचदा आवाज कमी जास्त होत असल्याने प्रत्यक्ष बैठकीची मागणी यावेळी शेतकर्यांनी कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्याकडे केली.या सर्व विषयांवर आयुक्त धीरजकुमार यांनी बाजू समजून घेत यावर काम करणार असल्याचे केळी उत्पादकांना सांगितले.

यांचा बैठकीत सहभाग
यावेळी जिल्हा कृषी अधीक्षकांच्या दालनात झालेल्या ऑनलाईन बैठकीस कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, कृषी सहसंचालक अनिल भोकरे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील, फळबागायतदार संघटनेचे अध्यक्ष व निंबोलचे प्रगतीशील शेतकरी रामदास पाटील, गणपूरचे एस.बी.पाटील, निंभोर्याचे सुनील कोंडे, धरणगावचे डॉ.सत्वशील पाटील, मोरगावचे आर.व्ही.पाटील, तांदलवाडीचे शशांक पाटील, निंबोलचे मोहन पाटील, विजय पाटील, गोरगावले, ता.चोपडा येथील भागवत महाजन, जीवन पाटील, कठोरा, ता.चोपडा येथील भूषण पाटील यांच्यासह शिरपूर येथून के.डी.पाटील, रावेरहून विशाल अग्रवाल, ऐनपुरहून भागवत पाटील, विकास महाजन, प्रवीण महाजन यांच्यासह बलवाडी येथून राहूल पाटील व अमोल पाटील, स्वप्नील पाटील उपस्थित होते. पुणे येथून कृषी आयुक्त धीरजकुमार, आयुक्त कार्यालयातील दीपाली देवरे, कृषी संचालक.डॉ के.पी.मोत यांच्यासह जळगाव जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, कृषी सहसंचालक अनिल भोकरे यांसह कार्यालयातील अन्य अधिकारी उपस्थित होते.

