कुटुंब प्रमुखाच्या विकासात कुटुंबाची साथ महत्त्वाची : राजीव शर्मा
भुसावळ : दैनंदिन कार्यामध्ये कुटुंबप्रमुख मग्न असतात. सोबत वेळ मिळाल्यानंतर सामाजिक दायीत्व लक्षात घेऊन समाजसेवेचे कार्य करीत असतात. ही समाजसेवा करताना आपल्या कुटुंबातील जबाबदार्या घरातील इतर कुटुंब सदस्य पूर्ण करत असल्याने कुटुंब प्रमुखाला आधार मिळतो परंतु आपल्या कुटुंबातील सदस्यांकडेदेखील लक्ष देण्याची गरज असून त्यांना वेळ दिला पाहिजे यामुळे बाहेर कार्य करताना मोलाची साथ मिळते यामुळे कुटुंबप्रमुखाच्या विकासात कुटुंबाची साथ महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल राजीव शर्मा यांनी केले.
भुसावळात सदस्यांचा स्नेहमेळावा
रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळमधील सदस्यांचे कुटुंबाचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी इनरव्हील असोशियशन ऑफ इंडियाचे माजी प्रेसिंडेट रश्मी शर्मा, उपप्रांतपाल धर्मेंद्र मेंडकी, रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळचे प्रेसिडेंट सुधाकर सनांसे, प्रोजेक्ट सेक्रेटरी संजय भटकर, कोषागार मुकेश अग्रवाल, डॉ.सुधीर शर्मा, माजी प्रेसिडेंट सुनील शीरनामे, प्रदीप सोनवणे, किशोर पाचपांडे, डॉ.पी.व्ही.पाटील, राजेंद्र परसे, आदील खान,, ज्योती सोनवणे, नूतन फालक आदी उपस्थित होते.

उल्लेखनीय कार्य करणार्या सदस्यांचा सन्मान
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सदस्यांचे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये कोरोना काळात महिलांची आरोग्य तपासणी डॉ.वंदना वाघचौरे यांनी केली. शिक्षण क्षेत्रामध्ये डीसीपीएस धारकांना स्लीप मिळवून देण्यासाठी योगेश इंगळे यांनी प्रयत्न केले तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये अनुकूल परीस्थितीवर मात करत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग मोकळा करून देत जिल्हा परीषद शाळा शिंदी, ता.भुसावळ येथील समाधान जाधव यांना जिल्हा परीषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल व वरणगाव येथील मुद्रांक विक्रेते बापू चौधरी यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन जीवन महाजन तर आभार सुनील वानखेडे यांनी मानले.
तरुणांनी रोटरॅक्टमध्ये या
रोटरी क्लब राष्ट्रीय स्तरावरील संघटन असून या माध्यमातून विद्यार्थीदशेत कार्य करण्याची संधी आहे तसेच परदेशात जाण्याचीदेखील संधी या माध्यमातून उपलब्ध होत असल्याने तरुणांनी रोटरॅक्टमध्ये आले पाहिजे व आतापासूनच समाजसेवेची सवय जडली पाहिजे, असे आवाहन उपप्रांतपाल धर्मेंद्र मेंडकी यांनी केले आहे.

