फैजपूर शहरात साडेसात लाखांचा गुटखा जप्त
फैजपूर : अन्न व औषध प्रशासनाने गोपनीय माहितीवरून शहरात तब्बल साडेसात लाखांचा गुटखा जप्त केल्याने अवैधरीत्या गुटखा विक्री करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मोहसीन शेख युनूस उर्फ कल्लू याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांडेलकर यांच्या तक्रारीवरून फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात प्रथमच अशा पद्धत्तीने मोठी कारवाई झाल्याने सुज्ञ नागरीकांनी कारवाईचे स्वागत केले आहे. शहरातील मिल्लत नगरात बुधवारी रात्री छापा टाकून गोण्यांमध्ये भरला गुटखा जप्त करण्यात आला. पथकाने बंदी असलेला विमल पान मसाला व सुगंधी तंबाखू मिळून सात लाख 68 हजार 768 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांडेलकर यांच्या नेतृत्वाखाली सहकारी किशोर साळुंखे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे, फौजदार रोहिदास ठोंबरे, हेड कॉन्स्टेबल रवींद्र मोरे, अनिल महाजन, उमेश चौधरी, चेतन महाजन यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.

