गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह आरोपी रावेर पोलिसांच्या जाळ्यात
रावेर : मध्यप्रदेशातील बर्हाणपूर येथून एक संशयीत गावठी कट्टा घेवून येत असल्याची माहिती रावेर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करीत संशयीताच्या ताब्यातून एक जिवंत काडतूस व 20 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त केला. गुरुवारी दुपारी बोरखेडा फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली. साईम जानबाज बेलदार (19, ख्वॉजा नगर, बंगाली फाईल, अमळनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. संशयीत आरोपी साईम बेलदार हा दुचाकी (एम.एच.39 ई.8819) ने अमळनेरकडे निघाला असताना महामार्गावरच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, रावेरचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी ईस्माईल शेख, सुरवाडे, मेढे, कुणाल पाटील, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, प्रदीप सपकाळे, सोनवणे यांनी केली.


