भुसावळातील अतिक्रमण महिनाभरात हटणार


मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांची माहिती : सत्तेचा दुरुपयोग कदापि खपवून घेणार नसल्याचा परखड इशारा

भुसावळ : शहराच्या चौफेर बाजूला अतिक्रमण झाले असून वर्दळीच्या रस्त्यांवर टपर्‍या थाटण्यात आल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्‍न शहरात जटील बनला आहे. या संदर्भात मुख्याधिकारी म्हणाले की, एका महिन्याच्या आत अतिक्रमण धारकांनी आपापल्या टपर्‍या तसेच अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा महिनाभरानंतर अतिक्रमण हटवले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. ते म्हणाले की, पालिकेच्या पाच विभागातील दोन पथकांतर्फे दर पंधरा दिवसांनी आता पालिकेच्या जागेवर व मालमत्तेवर केलेले अतिक्रमण हटवले जाणार आहे.

पालिकेच्या वसुली कर्मचार्‍यांना आदेश
भुसावळ पालिकेतील वसुली कर्मचार्‍यांना शहरातील ज्या-ज्या भागात बांधकामे वा अनधिकृत बांधकामे सुरू आहेत त्याची माहिती कळवण्यासंदर्भात आदेश काढत असल्याचे मुख्याधिकारी म्हणाले. वसुली कर्मचारी वसुलीनिमित्त बाहेर असल्याने त्यांच्या निदर्शनास अवैध बांधकाम वा सुरू असलेले बांधकाम दिसल्यानंतर त्यांनी माहिती मुख्याधिकार्‍यांना द्यावी व त्यानंतर संबंधित विभाग त्या बांधकामाची परवानगीची चौकशी करेल व परवानगी नसल्यास अवैध बांधकाम लागलीच पाडण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. सुज्ञ भुसावळकर नागरीकांनी अवैधरीत्या बांधकाम करण्यात आलेले गाळे विकत घेवू नये, असे आवाहन मुख्याधिकार्‍यांनी करीत अवैध गाळेदेखील तोडले जाणार असल्याचा इशारा दिला.


सत्तेचा दुरुपयोग खपवून घेणार नाही : मुख्याधिकारी
भुसावळातील मरीमाता मंदिरामागील नाल्याच्या काठी अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या तीन दुकानांवर जेसीबी फिरवल्यानंतर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता भुसावळ पालिका कार्यालयात प्रसिद्धी माध्यमांना मुख्याधिकार्‍यांनी कारवाईची माहिती दिली. याप्रसंगी त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. ते म्हणाले की, सुमारे दोन महिन्यांपूर्वी आपल्या मोबाईलवर अतिक्रमणासंदर्भात तक्रार आली होती व सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवकांकडून हे अतिक्रमण केले जात असून त्यातून लाखो रुपयांचा व्यवहार होत असल्याचे त्या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. तक्रारीच्या पडताळणीत तथ्य आढळले मात्र त्यावेळी अतिक्रमणाला केवळ सुरुवात असल्याने बांधकाम स्लॅब लेव्हलपर्यंत येईस्तोवर कारवाई करायची नाही, असे ठरवले व बांधकाम स्लॅबपर्यंत येताच गुरुवारी ते बंदोबस्तात हटवण्यात आले. सुरुवातीलाच बांधकाम तोडले असतेतर संबंधित अतिक्रमण करणार्‍याला आर्थिक झळ बसली नसती! सत्तेचा दुरुपयोग करून बेकायदा गाळे विकणार्‍यांच्या रॅकेटपर्यंत हा संदेश देण्यासाठी असे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले मात्र बांधकाम नेमके कुणी केले ? असा प्रश्‍न त्यांना विचारला असता त्याबाबत आपल्याकडे पुरावा नसल्याचे त्यांनी सांगिते मात्र यापुढे सत्तेचा कुणी दुरुपयोग करीत असल्यास ही बाब खपवून घेतली जाणार नसल्याचा सज्जड इशाराही त्यांनी दिला.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !