फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून 78 हजारांचा दंड वसुल
भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वेची धडक तिकीट तपासणी मोहिम
भुसावळ : कोरोना काळात केवळ आरक्षित रेल्वे गाड्या सुरू असतानाही काही प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असल्याने रेल्वे वाणिज्य प्रशासनाने शुक्रवारी भुसावळ रेल्वे स्थानकावर अचानक विशेष तिकीट तपासणी मोहिम राबवल्याने फुकट्या प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. विना तिकीट प्रवास करणार्या प्रवाशांसह अन्य रेल्वे नियमांचे उल्लंघण करणार्या 137 प्रवाशांवर कारवाई करीत तब्बल 78 हजार 90 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
कारवाईने उडाली खळबळ
भुसावळचे वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार व विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी.अरुण कुमार आणि सहायक वाणिज्य प्रबंधक (टी.जा.) अनिल पाठक व विशेष तिकीट तपासणी निरीक्षक वाय.डी.पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत 137 विना तिकीट प्रवास करणार्या प्रवाशांकडून 78 हजार 90 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला 21 तिकीट तपासणी कर्मचारी आणि 10 आरपीएफ स्टाफ यांनी ही कारवाई केली. जे प्रवासी दंड भरण्यास असमर्थ ठरले त्यांच्यावर रेल्वे अॅक्ट 137 नुसार दोन खटले तर रेल्वे अॅक्ट 144 नुसार तीन केसेस व रेल्वे अॅक्ट 147 नुसार दोन केसेस करण्यात आल्या. रेल्वे प्रवाशांनी कटू कारवाई टाळण्यासाठी आरक्षित रेल्वे तिकीट काढून प्रवास करावा तसेच कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


