यावल तालुक्यातील रोहयो कामांच्या चौकशीचे आदेश
मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराच्या तक्रारी : दोषींवर कारवाईची मागणी
यावल : तालुक्यातील विविध गावांमध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी झाल्याने या तक्रारींची तत्काळ चौकशी करून कार्यवाही करण्याचा आदेश रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी प्रसाद मते यांनी गटविकास अधिकारी यांना काढला आहे.
तत्काळ चौकशी करून अहवाल पाठवण्याचे आदेश
प्रसाद मते यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील उंटावद, पिळोदा, मनवेल, निमगाव, राजोरा, अंजाळे, वाघळुद, मारूळ, सांगवी बु.॥, चिखली खु.॥, अट्रावल या ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजने अंतर्गत होत असलेल्या वॉल कम्पाउंडच्या बांधकाम मोठ्या प्रमाणावर बोगस मजुरांची नोंदणी करून निकृष्ठ कामे करण्यात आल्याच्या लिखीत तक्रारी यावल तालुक्यातून सामाजिक संघटनेच्या माधमातून करण्यात आल्या होत्या. याची रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी प्रसाद मते यांनी तत्काळ दखल घेवून यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील यांना तत्काळ या सर्व गावांच्या कामांची त्वरीत नियमानुसार मुदतीच्या आत चौकशी व कार्यवाही केल्याचा तसा अहवाल जळगाव कार्यालयास पाठवावा, असे आदेशात नमूद आहे. रोहयोचे उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यवाहीच्या आदेश प्राप्तीने भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या बांधकाम अभियंते तथा ठेकेदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.


