जुन्या पेन्शन योजनेबाबत अधिसूचना रद्द केल्याने शिक्षकांमध्ये समाधान


मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी केला आमदार शिरीष चौधरींचा सत्कार

फैजपूर : जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात व्यत्यय आणणारी 10 जुलैची अधिसूचना शासनाने रद्द केल्याने यावल-रावेर तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर संघटनेने आमदार शिरीष चौधरी यांचे आभार मानत त्यांचा सत्कारही केला.

शिक्षकांना मिळाला दिलासा
1 नोव्हेबर 2005 पूर्वी व नंतर शासनाने 100 टक्के अनुदान मिळालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना 1982 ची पेन्शन योजना लागू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने जुनी पेन्शन देण्यात आडथळा आणणारी 10 जुलै 2020 रोजी काढलेली अधिसूचना शासनाने नुकतीच रद्द केल्याने यावल-रावेर तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर संघटनेने प्रातिनिधिक स्वरुपात रावेर विधानसभेचे आमदार शिरीष चौधरी यांचे आभार मानत यांचा सत्कार केला. ही अधिसूचना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना मारक ठरणारी होती व ही अधिसूचना नियम व अटींचे पालन करून रद्द करण्यात यावी यासाठी आमदार चौधरी यांनी महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेत पत्राद्वारे मागणी केली होती. त्याचप्रमाणे या विषयासंदर्भात महाविकास आघाडीच्या सर्व सन्माननीय विधान परीषद, विधानसभा सदस्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे वेळो-वेळी पाठपुरावा करून ही जाचक अधिसुचना रद्द करण्याबाबत यश मिळवले आहे. महाविकास आघाडी शासनाने ही अधिसूचना रद्द केल्याबद्दल व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार चौधरींचे आभार मानले. यावेळी यावल पंचायत समिती गटनेते शेखर पाटील, यावल मुख्याध्यापक संघाचे जयंत पाटील , कुंभारखेडा मुख्याध्यापक ए.डी.पाटील, मुख्याध्यापक गणेश गुर, ललित फिरके, अशफाक सर (मारूळ), ललित चौधरी, मल्लिक शरीफ, किशोर चौधरी (वड्री) आदींची उपस्थिती होती.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !