भुसावळ सायक्लीस्टचा बीआरएम 300 स्पर्धेत यशस्वी सहभाग
भुसावळ : स्पोर्टस् अॅण्ड रनर्स असोसिएशनच्या पंकज कुलकर्णी, विद्याधर इंगळे, विजय फिरके, गणसिंग पाटील व डॉ.नीलेश भिरुड या पाच सायकलपटूंनी धुळे येथे आयोजित बी.आर.एम.300 या तीनशे किलोमीटर सायकलिंग स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदविला. धुळे सायकलिंग क्लबतर्फे आयोजित या स्पर्धेसाठी धुळे-नाशिक-धुळे हा मार्ग निर्धारीत करण्यात आला होता तसेच ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी 20 तासांची कमाल वेळ ठरविण्यात आली होती. या मार्गात लळिंग घाट व चांदवड घाट पार करणे आव्हानात्मक होते त्यामुळे केवळ 21 सायकलपटू ही अवघड स्पर्धा पूर्ण करू शकले. त्याशिवाय मालेगावजवळ कोसळणारा धो-धो पाऊस व परतीच्या प्रवासात बहुतांश सायकलपटूंच्या लाईटची बॅटरी संपल्यामुळे त्यांनी अंधारात केलेले मार्गक्रमण यामुळे ही स्पर्धा अधिक आव्हानात्मक झाली.
देवपूर बसस्थानकापासून स्पर्धेला सुरूवात
पहाटे सहा वाजता धुळ्यातील देवपूर बसस्थानकापासून स्पर्धेला सुरुवात झाली. तेथून नाशिकच्या आडगाव नाका व तेथून परत धुळे येथील हॉटेल गणपती पॅलेस अशी स्पर्धेची सांगता झाली. कुठल्याही बाह्य मदतीशिवाय स्पर्धा सायकलपटूंना पूर्ण करायची होती. ही स्पर्धा पंकज कुलकर्णी यांनी रात्री 11.24 वाजता (वेळ- 17 तास 24 मिनिटे), विद्याधर इंगळे यांनी 11.39 वाजता (वेळ- 17 तास 39 मिनिटे), विजय फिरके यांनी मध्यरात्री 12:30 वाजता (वेळ- 18 तास 30 मिनिटे), गणसिंग पाटील यांनी रात्री 01:14 वाजता (वेळ- 19 तास 14 मिनिटे), डॉ.नीलेश भिरुड यांनी रात्री 01:16 वाजता (वेळ- 19 तास 16 मिनिटे) पूर्ण केली. सर्व यशस्वी सायकलपटूंचे भुसावळ स्पोर्टस् अॅण्ड रनर्स असोसिएशनच्या पदाधिकारी, सर्व धावपटू व सायकलपटू, शहरातील नागरीकांनी अभिनंदन केले.


