बजेट 2021 : नोकरदारांची निराशा ; इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाहीच !
नवी दिल्ली : अर्थसंकल्पात नोकरदारांना दिलासा मिळण्याची आशा असलीतरी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ‘इन्कम टॅक्स स्लॅब’मध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे करदाते असलेल्या नोकरदारांची काहीशी निराशा झाली आहे. 2020-21 या वर्षात देशात एकूण 6.4 कोटी नागरिकांनी आयकर भरल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. टॅक्स ऑडिटची मर्यादा 5 कोटींवरुन वाढवून 10 कोटी इतकी करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. याशिवाय 75 वर्षांवरील नागरिकांना ‘इन्कम टॅक्स’मधून आता सूट देण्यात आली आहे. ही सूट केवळ 75 वर्षे झालेल्या पेन्शनधारकांसाठीच असणार आहे.
असा आहे स्लॅब
2.5 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असून 2.5 लाख ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के आयकर भरावा लागणार आहे. पुढे 5 ते 7.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के, 7.5 ते 10 लाखांच्या उत्पन्नावर 15 टक्के, 10 ते 12.5 लाखांच्या उत्पन्नावर 20 टक्के, 12.5 ते 15 लाखांच्या उत्पन्नावर 25 टक्के आणि 15 लाखांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्नावर 30 टक्के आयकर भरावा लागणार आहे.

