इथे ओशाळली माणुसकी : रावेरातील पोलिसाच्या मृत्यूनंतरही कुटुंबाला मरण यातना कायम!
रावेर : रावेर पोलिस ठाण्यातील हवालदार श्रीराम रामदास वानखेडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर त्यांना नाशिकमधील मॅग्नम या प्रतिष्ठीत रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू ओढवला. मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी कागदपत्रांच्या पूर्ततेच्या नावाखाली रुग्णालयाने अडवून ठेवल्याचा संतापजनक प्रकार नाशिकमध्ये घडल्याने या प्रकाराविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
रुग्णालयाच्या आडमुठेपणाबद्दल पोलिस दलातून तीव्र संताप
रुग्णालयाने वानखेडे यांना मृत घोषित करण्यापूर्वी त्यांच्या नातेवाईकांच्या 30 ते 35 स्वाक्षर्या घेतल्या आणि दुसर्याच क्षणी वानखेडे यांना मृत घोषित करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. विम्याच्या कागदपत्रांची पूर्तता होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात देणार नाही, अशी आडमुठी भूमिका रुग्णालयाने घेतली तसेच शनिवार व रविवारी आलेल्या सुट्यांमुळे होणारा विलंब पाहून नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली मात्र ती धुडकावून लावण्यात आली.
कचरा जमा करणार्या घंटा गाडीत बालकाचा मृतदेह आढळला : अमळनेरातील घटना
प्रहार संघटनेने घेतली दखल
ही बाब प्रहार संघटनेचे अध्यक्ष अनिल भडांगे यांना कळवण्यात आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले व फोनवरूनच संवाद साधल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नाशिक आयजींच्या विशेष पथकातील निरीक्षक बी.जी.रोहोम यांनीदेखील धाव घेवून रुग्णालय प्रशासनाला समजावले मात्र रुग्णालय प्रशासन नियमांवर अडून बसले होते.
शोकाकुल वातावरणात अंत्यंस्कार
प्रहारचे अनिल भडांगे यांनी प्रशासनाशी केलेल्या चर्चेनंतर मृतदेह ताब्यात देण्यात आल्यानंतर रविवारी शोकाकुल वातावरणात कर्मचारी श्रीराम रामदास वानखेडे (53, हरीविठ्ठल नगर, जळगाव) यांच्या मृतदेहावर जळगावात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृतदेह अडवला नाही : डॉ.मनोज चोपडा
मृतदेह अडवून ठेवण्याबाबत कोणतही कारवाई रुग्णालयाकडून करण्यात आलेली नाही तर विमा संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता करण्याइतपत नातेवाईकांशी बोलणे झाले व ही नियमित बाब असून रुग्णावर योग्य उपचार सुरू असल्याचे मॅग्नम हॉस्पीटलचे डॉ.मनोज चोपडा म्हणाले.


