धुळ्यात चारीत्र्याच्या संशयातून पत्नीची गळा आवळून हत्या

खुनानंतर आरोपी पती पसार : जमनागिरी परीसरात खळबळ


Wife strangled to death due to suspicion of character in Dhule धुळे : पत्नीच्या चारीत्र्यावर नेहमीच संशय घेणार्‍या रीक्षा चालक पतीने आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना जमनागिरी परीसरातील भिलाटी भागात रविवार, 15 रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. निता वसंत गांगुर्डे (मूळ रा.देवपूर, ह.मु.जमनागिरी रोड, धुळे) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी पती बादल सोहिते (नाहार) विरोधात धुळे शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीने गळा आवळून हत्या केल्याचा संशय
आरोपी बादल सोहिते हा पत्नी निता गांगुर्डे सोबत गेल्या दोन वर्षांपासून जमनागिरी भागातील भिलाटीतील भाडे तत्वावरील घरात वास्तव्यास होता मात्र दोघांमध्ये नेहमीच या ना त्या कारणावरून खटके उडत होते. पती आपल्या चारीत्र्यावर नेहमीच संशय घेत असल्याची माहिती निताने आपल्या कुटूंबियांना दिली होती. शनिवारी मध्यरात्री आरोपी पतीने पत्नीचा गळा आवळून तसेच चेहरा व गालावर मारहाण करून खून केला व पहाटेच्या सुमारास तो पसार झाला.

पोलिस अधिकार्‍यांची धाव
रविवारी सकाळी जमनागिरी रोड भागात पाणी आल्यानंतर रहिवाशांनी निता गांगुर्डेला आवाज दिल्यानंतर ती बाहेर न आल्याने घरात पाहणी केली असता ती मृतावस्थेत दिसून आल्यानंतर शहर पोलिसांना माहिती कळवण्यात आली. सहा.पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी, धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, सहा.निरीक्षक डी.पी.पाटील, उपनिरीक्षक के.एस.दामोदर यांच्यासह फॉरेन्सिक टीमने भेट देत पाहणी केली. विवाहितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हिरे शासकीय महाविद्यालयात हलवण्यात आला. मृत विवाहितेचा भाऊ सचिन वसंत गांगुर्डे (28, आंबेडकर नगर, देवपूर, धुळे) यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी बादल सोहिके (घर नंबर पाच, गोपाळनगर मागे, भिलाटी, जमनागिरी, धुळे) विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पसार झाला असून त्याचा कसून शोध सुरू असल्याची माहिती निरीक्षक आनंद कोकरे यांनी दिली.


कॉपी करू नका.