सोळाशे रुपयांची लाच भोवली : सुळीतील लाखचोर मुख्याध्यापकांची एसीबीने भरवली शाळा


Suli Vidyalaya Principal Nandurbar in ACB net नंदुरबार : शाळा सोडल्याच्या दाखल्यावर चुकीची दुरुस्ती करून देण्यासह दहावीचे मार्कशीट देण्यासाठी एक हजार 600 रुपयांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या नवापूर तालुक्यातील सुळी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदलाल शांताराम शीनकर (47, साईनगरी मेन रोड, नवापूर) यांना नंदुरबार एसीबीने मंगळवारी दुपारी लाच स्वीकारताच अटक केली. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, शीनकर यांना बुधवारी नंदुरबार न्यायालयात हजर केले असता एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

लाच स्वीकारताच केली अटक
पिलखोड, ता.चाळीसगाव येथील 35 वर्षीय तक्रारदार यांनी सन 2017-2018 यावर्षी माध्यमिक विद्यालय सुळी, तालुका नवापूर येथे इयत्ता दहावीचे शिक्षण घेतले होते. तक्रारदार हे त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला व मार्कशीट घेणे कामी माध्यमिक विद्यालयात गेल्यानंतर मुख्याध्यापक यांनी तक्रारदाराकडून 14 जानेवारी 2023 रोजी पाच हजार रुपये घेऊन शाळा सोडल्याचा दाखला दिला. तक्रारदार यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर त्यांच्या आईचे नाव चुकीचे असल्याने चुकीचे नाव दुरुस्त करून घेण्यासाठी व त्यांचे इयत्ता दहावीचे मार्कशीट घेणे कामी तक्रारदार यांनी मुख्याध्यापकांना विनंती केल्यानंतर त्यांनी 17 रोजी एक हजार सहाशे रुपयांची लाच मागितली व यावेळी तक्रारदाराने नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोंदवली व सापळा रचून आरोपी मुख्याध्यापकास अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक समाधान एम.वाघ, विजय ठाकरे, अमोल मराठे, देवराम गावीत आदींच्या पथकाने यशस्वी केला.


कॉपी करू नका.