विसरवाडीतील लाचखोर पोलिस कर्मचारी नंदुरबार एसीबीच्या जाळ्यात

गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली आठ हजारांची लाच : नंदुरबार एसीबीची रात्री उशिरा कारवाई


Visarwadi bribe-taking police personnel in Nandurbar ACB’s netनंदुरबार : नवापूर तालुक्यातील मुख्याध्यापकावर एक दिवसांपूर्वीच एसीबीची कारवाई झाल्याची घटना ताजी असतानाच विसरवाडी येथील पोलिसाने गुन्हा दाखल न करण्यासाठी तडजोडीअंती आठ हजारांची स्वीकारल्यानंतर त्यास नंदुरबार एसीबीच्या पथकाने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. दारासिंग जोरदार पावरा (35) असे अटकेतील पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे.

गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली लाच
42 वर्षीय तक्रारदार कुंकरान, ता.नवापूर येथील रहिवासी असून त्यांचे अन्य संशयीतांशी झालेल्या वादानंतर गुन्हा दाखल न करण्यासाठी 10 हजारांची लाच विसरवाडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी दारासिंग पावरा यांनी बुधवारी मागितली होती मात्र आठ हजार रुपयांमध्ये तडजोड झाली. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी नंदुरबार एसीबीकडे याबाबत तक्रार केल्यानंतर लाचेची पडताळणी करून सापळा रचण्यात आला. बुधवारी रात्री उशिरा लाच स्वीकारताच पावरा यांना अटक करण्यात आली व त्यांच्याविरोधात विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नंदुरबार एसीबीचे पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक माधवी एस.वाघ, हवालदार विलास पाटील, हवालदार ज्योती पाटील, नाईक मनोज अहिरे, अमोल मराठे आदींच्या पथकाने ययशस्वी केला.


कॉपी करू नका.