नृत्य, नाट्य व संगीताचा अप्रतिम आविष्कार ‘कमली की सत्वपरीक्षा’
खान्देश नाट्य महोत्सव : भुसावळकरांचा नाट्य महोत्सवाला प्रतिसाद
Amazing invention of dance, theater and music ‘Kamali ki sattvapariksha’ भुसावळ : शहरात सुरू असलेल्या खान्देश नाट्य महोत्सवात ‘संगीत कमलि की सत्वपरीक्षा’ या नाटकात नृत्य, नाट्य व संगीताचा अप्रतिम आविष्कार पाहायला मिळाला. शिवाय मराठी, हिंदी, मारवाडी, मालवणी अशा भाषांचा वापर करीत नौटंकी व दशावताराचा सुंदर मिलाफ रसिकांना वेगळीच नाट्य अनुभुती देऊन गेला. शहरातील कृष्णचंद्र सभागृहात उत्कर्ष कलाविष्कार तर्फे आयोजित अकराव्या नानासाहेब देविदास गोविंद फालक स्मृती खान्देश नाट्य महोत्सवाच्या दुसर्या दिवशी पुण्याच्या ललित कला केंद्राच्या रेपर्टरी तर्फे ‘संगीत कमली की सत्वपरीक्षा’ हे नाटक सादर करण्यात आले.
भुसावळकरांना भावले नाटके
स्त्री एकेकाळी स्वतंत्र होती. नाटकशाळा, रंगशाळेत महिलांना सन्मान असायचा. मात्र यानंतर स्त्रियांना चौकटी घालून देण्यात आल्या. लक्ष्मणरेषेच्या बाहेर स्त्रियांना जावू दिले जात नाही. स्त्रियांच्या आयुष्यावर पुरुषांचे कसे नियंत्रण असते. या नियंत्रणाला छेदण्याचा प्रयत्न या नाटकातून झाला. संपूर्ण विनोदी व ब्लॅक ह्यूमर पध्दतीने जाणारे या नाटकात दशावतार, लावणी, नाट्यगिते, जून्या हिंदी चित्रपट गितांच्या चालीवरील गितांचा वापर करण्यात आला. यासोबत मालवणी, भोजपूरी व हिंदी या भाषांचा वापर करुन अत्यंत वेगवान पध्दतीने जाणारे हे नाटक भुसावळकरांना भावले. नाटकाच्या नावामुळे नाटकाविषयी उत्सुकता होती. नाटकातील अप्रतिम संवाद, नृत्य व संगीतातील अप्रतिम टिम वर्क यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

नौटंकी आणि दशावताराचा मिलाफ
नाटकाची गोष्ट अशी की उत्तर प्रदेशात नौटंकी करणारी कमली ही कोकणात दशावतारी नाटकांमध्ये काम करणार्या दशावताराच्या प्रेमात पडते दशावतारी तिला आंबा देऊन लग्नाची मागणी घालतो आणि ती सुद्धा त्याच्या प्रेमात पडते त्याचं लग्न होतं. पण पुढे तिला स्वप्नात वेगवेगळे पुरुष वेगवेगळे फळ घेऊन येताना दिसू लागतात. लग्नानंतर दशावतारी बंधन घालतो मात्र ती ते नाकारते. गोष्ट पुढे रंगत जाते साधारणपणे लोककला प्रकारच्या अंगाने उभ्या केलेल्या या नाटकात नौटंकी आणि दशावताराचा मिलाफ आहे. मूळ दशावतारी नाटकाचा किंवा नौटंकीचा या नाटकाच्या बांधणीशी थेट संबंध नसला तरी या दोन्ही लोककला प्रकारांमध्ये वापरली जाणारी भाषा, चारी, नृत्य, संगीत तसेच विनोदाची शैलीचा वापर नाटकात केलेला आहे. त्याचबरोबर बाल्या नृत्य, जाकडी नृत्य, मराठी संगीत नाटक, सवाल जवाब, शेरोशायरी अशा अनेक गोष्टींची सरमिसळ करून मराठी मालवणी, हिंदी व मारवाडी या भाषा नाटकात सपखलपणे वापरण्यात आल्या आहेत. विवाह संस्थांना दिलेले सामाजिक संकेत आणि सर्व मान्य चौकट यामधून सुटू पाहणार्या कमलीची गोष्ट नृत्य नाट्यसंगीत आणि विनोद यांच्या आधारे सांगण्याचा प्रयत्न या दोन अंकी नाटकात करण्यात आला आहे. नाटकाचे लेखक शंतनू अडसुळ व दिग्दर्शन महेश खंदारे यांनी केले आहे.
या कलावंतांच्या भूमिकेला दाद
नाटकात शुभम साठे, रुचिका खोत, विक्रांत धिवरे, सुशांत कुंभार, भाग्यश्री पवार अवंती लाटणकर, समरीन बर्डे, ज्ञानदीप कासले, तेजस्विनी कोळेकर गजानन जाधव, शिवम पंचभाई, तेजस कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहे. हे नाटक स्वर्गीय पांडुरंग महाजन यांना समर्पित करण्यात आले होते. व्यवसायीक हर्षद महाजन व उद्योजक अश्विनकुमार परदेशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. धनश्री जोशी यांनी सूत्रसंचलन केले. उत्कर्ष कलाविष्कारचे अध्यक्ष अनिल कोष्टी व सहकार्यांनी नाट्यमहोत्सवाचे उत्कृष्ठ आयोजन केले आहे.