‘लोकशाही’मुळेच देशात राजा असो वा रंग सर्वांनाच समान न्याय !
युवारंगमध्ये वादविवाद स्पर्धा रंगली : दर्जेदार कलाविष्काराने गाजतोय ‘युवारंग’
It is because of ‘democracy’ that equal justice is given to everyone in the country whether it is a king or a color! फैजपूर : युवारंग महोत्सवाचा दुसरा दिवस मूकनाट्य, मिमिक्री, समूहनाट्य, कोलाज, क्ले मॉडेलिंग व वादविवाद स्पर्धांनी गाजला. रंगमंच क्रमांक तीनवर झालेल्या वादविवाद स्पर्धेचा विषय भारतीय राज्यघटनेनुसार भारतात लोकशाही अंमलात आहे का ? हा होता. या विषयावर अनुकूल व प्रतिकुल दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. देशातील लोकशाही परंपरा टिकून राहण्यासाठी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारतीय राज्यघटना ही एकमेव आधार असून या राज्य घटनेच्या आधारे देशात लोकशाही टिकून आहे त्यामुळे ‘राजा असो रंक दोषी’ असल्यास त्यांच्यावर अटळ असल्याचा विश्वास विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला.
भारतातील लोकशाही परंपरा उत्कृष्टच
विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक विषय असलातरी स्पर्धक विद्यार्थ्यांनी अतिशय उस्फूर्तपणे आणि वैचारीक मांडली केली. अनेक विद्यार्थ्यांनी भारत हा खंडप्राय देश असला तरी यातील बहुसंख्य समाज विशिष्ट जाती, धर्म, प्रांत, भाषा, बोली संस्कृती, आचार-विचार, संस्कार यांनी नटलेला असून देशातील या सर्व बाबी लक्षात घेता इथली लोकशाही परंपरा अत्यंत उत्तम आहे, असे मत मांडले. लोकशाही मूल्य, समानता, हक्क आणि जबाबदारी यासाठी व त्यातून बंधूत्व टिकण्यासाठी ज्या गोष्टींचा भारतीय राज्यघटनेमध्ये विचार मांडला आहे त्या विचारांचे कायद्यात रूपांतर करून हा भारत सार्वभौम सत्ता म्हणून कशा पद्धतीने या सर्व लोकशाही मूल्यांचा संरक्षण करत आहे याचे स्पष्टीकरण विविध कलम, कायदे आणि उपकलम यांची अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांनी स्प्ष्ट केले.

कायद्यापेक्षा कुणीही नाही मोठा
देशातील लोकशाही किती कणखर आहे याचे उदाहरण देताना विद्यार्थी म्हणाले की, राज्यघटनेतील तरतुदींमुळेच राजा असो की रंक असो, श्रीमंत असो वा गरीब, नेता असो की अभिनेता असो कोणीही कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही. उदाहरणादाखल सिनेकलावंत सलमान खानचे उदाहरण देण्यात आले. एका निरपराध मुक्या प्राण्याला जेव्हा त्याच्या गाडीने उडविले तेव्हा त्याला सुद्धा तुरुंगात जावे लागले आणि अजूनही त्याच्यावर खटला सुरू आहे त्यामुळे भारतात कायदे पाळले जातात, कायद्यांचे राज्य आहे म्हणूनच लोकशाही शाबूत आहे. अनेक मोठमोठे पुढारी आजही तुरुंगात आहेत. चारा घोटाळ्यात लालूप्रसाद यादवांना तुरुंगात जावे लागले, मुद्रांक घोटाळ्यात पी.चिदंबरम यांना तुरुंगात जावे लागले तसेच आजही देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत तसेच मुद्रांक घोटाळ्यामुळे अब्दुल करीम तेलगी याला तुरुंगात जावे लागले शिवाय अनेक वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकलेले पुढारी, नेते, अभिनेते यांना त्यांच्या अवैध कृत्यामुळे तुरुंगात जाताना पाहत आहोत. या सर्व गोष्टी एकच दर्शवितात की राज्यघटनेत कोणताही भेदभाव न करता गुन्हेगार हा केवळ गुन्हेगारच आहे या दृष्टीने कार्यवाही केली जाते, प्रत्येकाला समान न्याय देण्याचे काम व लोकशाही व्यवस्था टिकून ठेवण्याचं काम राज्यघटनेतील तरतुदीमुळेच शक्य असल्याचा आशावाद स्पर्धकांनी व्यक्त केला. इथल्या लोकांना गुलामगिरीने, हुकूमशाहीने, कधीच गिळंकृत केले असते,जर राज्यघटना राहिली नसती तर हा देश वाचविणे कठीण झाले असते, म्हणून अनुकूल बाजूने मत मांडत असताना लोकशाही भारतात अतिशय चांगल्या पद्धतीने राबविली जात आहे आणि त्याचा मुख्य कारण म्हणजे भारतीय राज्यघटना, असेही विद्यार्थी म्हणाले.
छुप्या जाती-वादाचा देशात शिरकाव
प्रतिकूल बाजूने बोलत असताना विद्यार्थ्यांनी तेव्हढेच प्रभावीपणे तर्क मांडले. अनेक विद्यार्थ्यांनी भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत, असे आपण म्हणत असलोतरी या देशातील विविधतेने नटलेल्या परंपरांमध्ये ज्या पद्धतीने छुप्या जातीवादाचा धर्मवादाचा आणि प्रस्थापितांचा शिरकाव झाला आहे. तो इथली बंधुता , इथलं सर्व धर्म समानता इथले सार्वभौम सत्ताक, प्रजेचे राज्य आणि इथली न्यायव्यवस्था पूर्णपणे मोडीत काढत आहे. निर्भया हत्याकांड, एका मुलीचे 35 तुकडे करून फेकून देणारा नराधम, स्त्रियांवर होणारे रोजचे अत्याचार, वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे, सामाजिक आंदोलने त्या आंदोलनाच्या माध्यमातून उमटणार्या सामाजिक प्रतिक्रिया, वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक प्रतीके, समाज सुधारकांना सुद्धा या देशात वेगवेगळ्या वर्गात विभाजून जातीचा आणि धर्माचा मुलामा चढवला आहे. त्यांना एक राष्ट्रीय नेतृत्व न मानता एक सामाजिक नेतृत्व या ठिकाणी करून सोडलेला आहे म्हणूनच विशिष्ट प्रकारच्या नेत्यांचा विशिष्ट प्रकारचा समुदायाच गौरव करत असताना दिसत असतो. या सगळ्या गोष्टी उघडपणे पाहत असताना प्रत्यक्ष जाणवतं या देशात कायद्याचं राज्य हे कधीच संपलेल आहे आणि या देशात टोळ्या-टोळ्यांचे राज्य उदयास आले आहे. अनेक कायदे असताना सुद्धा ज्याच्या हातात सत्ता आहे तो सत्तेचा गैरवापर करून लोक गरीबांवर, स्त्रियांवर, अनेक निरपराध लोकांवर अत्याचार करत आहेत. कायदे सक्षम असून सुद्धा कायद्याचं पालन या ठिकाणी सक्षमपणे केले जात नाही म्हणून सामान्य माणूस हा पोलिसांकडे, न्यायव्यवस्थेकडे जाण्यासाठी घाबरतो. धार्मिक स्थळांचा वापर सर्रासपणे सामाजिक ध्रुवीकरणासाठी केला जात आहे, हे सामाजिक ध्रुवीकरण लोकांमध्ये भेदाभेद निर्माण करत असते आणि या भेदाभेदा मुळेच सामाजिक स्वास्थ्य नष्ट होत असते व लोकशाही ही केवळ नावापुरतीच उरली आहे अशा प्रकारचे परखड मत सुद्धा या ठिकाणी स्पर्धकांनी मांडले.