भुसावळातील नगरसेवक अपात्रता प्रकरण : औरंगाबाद खंडपीठात आज सुनावणी ; निकालाकडे लागले लक्ष


Bhusawal corporator disqualification case : Aurangabad bench hearing today ; Focused on the result भुसावळ : भाजपच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर पालिकेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात आले होते. या प्रकरणी अपात्र नगरसेवकांनी जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाविरोधात राज्य शासनाकडे अपील केले होते. राज्य शासनाच्या नगरविकास विभागानेही हा निर्णय कायम ठेवल्याने अपात्र नगरसेवकांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. या प्रकरणी सोमवार, 13 रोजी सुनावणी होत असून त्याकडे शहरातील राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे.

राजीनामा न देताच केला राष्ट्रवादीत प्रवेश
भुसावळ पालिका निवडणूकीत 2016 मध्ये झालेल्या निवडणूकीत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे नऊ नगरसेवक यांनी कार्यकाळ संपण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका पुष्पा बतरा यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अपात्रतेची कारवाईबाबत याचिका दाखल केली. या याचिकेवर जिल्हाधिकार्‍यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण देविदास भोळे, नगरसेवक अमोल इंगळे, लक्ष्मी मकासरे, सविता मकासरे, प्रमोद नेमाडे, मेघा वाणी, बोधराज चौधरी, शोभा नेमाडे, किरण कोलते, शैलेजा नारखेडे यांना अपात्र ठरविले होते. यानंतर नगर विकास विभागानेही जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय कायम ठेवला होता.

सुनावणीकडे लागले लक्ष
या प्रकरणी अपात्र नगरसेवकांनी औरंगाबाद खंडपीठात अपील केले. या अपिलावर आतापर्यंत तीन ते चार तारीख झाल्या. आता या प्रकरणी सोमवार, 13 रोजी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होत आहे. या दिवशी सुनावणीत दोन्ही बाजूंचे म्हणणे सादर केले जाईल. या सुनावणीकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. अपात्र नगरसेवकांकडून अ‍ॅड.आर.आर.देशमुख तर भाजपच्या माजी नगरसेविका पुष्पा बतरा यांच्या वतीने अ‍ॅड.होन कामकाज पाहत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !