रावेर लोकसभेसाठी संतोष चौधरींनी ठोकले षड्डू : 24 रोजी उमेदवारी दाखल करणार

भुसावळात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा : धनशक्तीच्या जोरावर रावेर लोकसभेत श्रीराम पाटील यांना तिकीट मिळाल्याचा दावा

0

गणेश वाघ
भुसावळ : रावेर लोकसभेसाठी आपण उमेदवारीच मागितली नव्हती मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच आपल्याला कामाला लागण्याचे आदेश दिल्याने आपण तयारी केली, कार्यकर्त्यांनी आपले जोरदार स्वागत केल्याने आपली ताकद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. दुसरीकडे धनशक्ती असलेल्या उमेदवाराला पक्षाने अचानकपणे तिकीट जाहीर केल्याने कार्यकर्ते प्रचंड दुखावले आहेत मात्र आपण आता मोठा निर्णय घेत आहोत. रावेर लोकसभेसाठी 24 एप्रिल रोजी अर्ज दाखल करू, अशी घोषणा माजी आमदार संतोष चौधरी यांनी भुसावळातील मेळाव्यात केली. माजी मंत्री एकनाथ खडसे व खासदार रक्षा खडसेंवरही त्यांनी टिका केली.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, माजी नगरसेवक उल्हास पगारे, सलीम पिंजारी, संगीता ब्राह्मणे, आऊ चौधरी, दीपक मराठे, फिरोज शेख, राजेंद्र चौधरी, आशिक खान शेर खान, विनोद कोळी, रमेश पाटील आदींची उपस्थिती होती.

15 वर्ष चौधरी परिवारावर अन्याय
माजी आमदार चौधरी म्हणाले की, चौधरी परिवारावर सातत्याने 15 वर्ष अन्याय करण्यात आला, खोटे गुन्हे दाखल करून तुरूंगात टाकण्यात आले. राष्ट्रवादी पक्षावर आपण निष्ठा ठेवली मात्र निष्ठेचे फळ मिळालेच नाही. राष्ट्रवादीकडून अ‍ॅड.रवींद्र पाटील व मी स्वतः दोनच उमेदवार होतो मात्र अ‍ॅड.पाटील यांनी माघार घेतल्यानंतर रिंगणात मीच होतो मात्र अचानक चौकडीकडून सूत्रे हलली व पैशावाल्या उमेदवाराची आधी मुलाखत झाली. आधी त्यांना तिकीट देण्यात आले व मगच त्यांचा पक्षात प्रवेश करून घेण्यात आला. भाजपावर तिकीटाचे आरोप होतात मात्र प्रथमच राष्ट्रवादीत धनशक्ती असलेल्या उमेदवाराला तिकीट मिळाल्याचे राजकारणात प्रथमच पाहिले, असेही ते म्हणाले.

आधी खडसेंचा राजीनामा घ्या
आमदार खडसे यांचा पवार साहेबांनी आधी राजीनामा घ्यावा, अशी मागणी चौधरी यांनी यावेळी करीत त्यांच्यावर चौफेर टिका केली शिवाय त्यांच्या घराणेशाहीवरही भाष्य केले. खडसे यांच्यावर कारवाई होण्याची वेळ आल्याचे विधान त्यांनी करीत त्यांच्या रखडलेल्या प्रवेशावरही भाष्य केले. खडसे परिवाराला सुनावण्यात आलेल्या 137 कोटींच्या दंडाला स्थगिती उठवण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत, असा दावा त्यांनी केला.

24 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार
माजी आमदार चौधरी म्हणाले की, 21 रोजी शरद पवार हे मुक्ताईनगरात येत आहेत, त्यांची आपण भेट घेवून आपली स्पष्ट भूमिका मांडणार आहोत व 24 रोजी आपण रावेर लोकसभेसाठी उमेदवारी दाखल करणार आहोत. मुक्ताईनगरात कदाचित पवार साहेब काही चमत्कार करतील, असेही त्यांनी सांगितले. चार पक्षांकडून आपल्याला प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर असून त्याबाबत आपण योग्य तो निर्णय घेवू मग या पक्षाची निशाणी भले काहीही असो. आतापर्यंत आपल्याकडील एबी फार्म पळवण्यात आले मात्र आता एबी फार्मच आपण वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगत संबंधित पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद आपल्याकडे असेल, असेही त्यांनी सांगितले.

चौधरी परिवार कुटनितीचे बळी : अनिल चौधरी
चौधरी परिवार कुटनितीचा बळी ठरला आहे मात्र मोठ्या बंधूंनी भूमिका जाहीर करावी, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. श्रीराम पाटील हे धनवान उमेदवार असल्याने त्यांना तिकीट मिळाले. आमदार शिरीष चौधरी यांच्या माध्यमातून हे सर्व घडले आहे मात्र त्याचा फटका त्यांना आगामी निवडणुकीत बसेल. हे सर्व राजकारण मुक्ताईनगरच्या आशीर्वादाने घडले आहे. आता नुसतेच लढाईचे नाही तर जिंकायचे आहे. विरोधकांना आम्ही कधीच मोजत नाही व मोजणारही नाही, असेही ते म्हणाले.


कॉपी करू नका.