राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटलांच्या विरोधात माजी आमदार चौधरींची बंडाळी !

जळगावचे पार्सल परत पाठवू : भुसावळातील निर्धार मेळाव्यात कार्यकर्त्यांचा सूर : तीन महिन्यात तीन पक्ष बदलणार्‍यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी : माजी आमदार संतोष चौधरी रींगणात उतरल्यास चित्र बदलणार !

0

Nationalist candidate Shri Ram Patla against Maji MLA Chowdhury Bandali ! भुसावळ : माजी आमदार संतोष चौधरी यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनातून विरोधकांच्या पायाखाली वाळू सरकली आहे त्यामुळे पडद्याआड अनेक हालचाली घडल्या व विरोधकांचा पराभव होण्याच्या भीतीने माजी आमदार चौधरींचे तिकीट कापण्यात आले मात्र पैशांचा जोर असलेल्या आयात उमेदवाराला राष्ट्रवादीने तिकीट दिले असलेतरी पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकता येत नाही त्यासाठी मतदारांचे प्रेम, विश्वास जिंकावा लागतो, जनतेची कामे करावी लागतात. हा विश्वास माजी आमदार संतोष चौधरींनी जिंकला आहे. त्यांच्यासोबत जनता आहे त्यामुळे आयात उमेदवार श्रीराम पाटील यांना आता जळगावात परत पाठवायचे असून माजी आमदार संतोष चौधरी रिंगणात उतरल्यास चित्र बदलेल, असा सूर भुसावळातील निर्धार मेळाव्यात कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. भुसावळ शहरातील तेली समाज मंगल कार्यालयात सोमवारी सायंकाळी सहा वाजता राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा झाला. यावेळी कार्यकर्त्यांकडून माजी आमदार संतोष चौधरी यांनी रावेर लोकसभेच्या आखाड्यात उतरून आपली ताकद दाखवावी यासाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरला.

तीन महिन्यात तीन पक्ष बदलणार्‍यांना उमेदवारी
फिरोज शेख म्हणाले की, संतोषभाऊंच्या शक्तीप्रदर्शनाची दखल दिल्लीपर्यंत घेतली गेली व ते खासदार होतील या भीतीनेच उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. 15 वर्ष ज्यांनी कुटनिती केली त्यांचा कदाचित त्यामुळे पडदा उघडा पडला असता मात्र सर्वसामान्य जनता चौधरींच्या पाठीशी आहे व राहील. धनशक्तीच्या जोरावर तिकीट मिळाले असलेतरी त्यामुळे निवडणुका कधीही जिंकता येत नाहीत. प्रेमाने व कामाने मतदारांना जिंकता येते.

आयात उमेदवाराला आता जळगावात पाठवायचे आहे
विनोद निकम म्हणाले की, भुसावळात संतोष चौधरींनी इतिहास घडवला आहे व सामान्यांचे काम केले आहे. श्रीराम पाटील हे जळगावातील रहिवासी आहेत. त्यांचा रावेर लोकसभा मतदारसंघाशी संबंध नाही त्यामुळे त्यांना आता परत जळगावात पाठवायचे आहे.

पडद्याआड मोठ्या घडामोडी
प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील म्हणाले की, भाऊंना तिकीट मिळणार असल्याने त्यांनी दिल्लीत दोन लाख तुतार्‍या बुक केल्या होत मात्र पडद्याआड मोठ्या घडामोडी घडल्या व माजी आमदार संतोष चौधरी यांचे अचानक तिकीट कापण्यात आले.

तिकीट वाटपात ऐनवेळी भाकरी फिरवली
उमेश मराठे म्हणाले की, तिकीट जाहीर करताना ऐनवेळी भाकरी फिरवण्यात आली. विरोधकांच्या तंबूत प्रचंड घबराट पसरली आहे. मतदारसंघात उद्योगधंदे यावेत ही बेरोजगार तरुणांची इच्छा आहे मात्र हायमास्ट लावण्यापलिकडे कुठलाही विकास झाला नाही.

चौधरी परिवाराचे अस्तित्व कधीही संपणार नाही
जयेश संतोष चौधरी म्हणाले की, चौधरी परिवाराचे अस्तित्व कधीही संपणार नाही. वडिलांना बदनाम करण्यात आले मात्र वडिलांचे राजकारण समाजाच्या मनात रूजले आहे. रावेर लोकसभा जिंकण्यासाठी आम्हाला पाच दिवस पुरेसे आहेत. प्रत्येक कार्यकर्ता हा शंभर कार्यकर्त्यांच्या बरोेबर आहे. वडिलांनी आता योग्य निर्णय घेतल्यास रावेर लोकसभेत इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर माजी आमदार संतोष चौधरी, प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, माजी नगरसेवक उल्हास पगारे, सलीम पिंजारी, संगीता ब्राह्मणे, आऊ चौधरी, दीपक मराठे, फिरोज शेख, राजेंद्र चौधरी, आशिक खान शेर खान, विनोद कोळी, रमेश पाटील आदींची उपस्थिती होती.


कॉपी करू नका.