भुसावळकरांना मोठा दिलासा : हतनूर धरणातून शहरासाठी आवर्तन

0

Big relief for Bhusawalkars: Avartan for the city from Hatnoor Dam भुसावळ : हतनूर धरणातून भुसावळ शहर, रेल्वे व दीपनगर औष्णिक केंद्रासाठी मार्च महिन्यात दुसरे आवर्तन सोडण्यात आल्याने शहराचा पाणीप्रश्न मिटला होता मात्र शहरात टंचाईच्या झळा वाढल्यानंतर पाण्यासाठी होणारी गैरसोय टाळण्यासाठी आता हतनूर धरणातून रविवारी शहरासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत धरणाचे पाणी बंधार्‍यात पोहोचल्यानंतर भुसावळकरांची आगामी 40 दिवसांची तहान बंधार्‍यातील जलसाठ्यातून भागणार आहे. यासोबत कमी दाबाने पुरवठा होणार्‍या पाणीपुरवठ्याचा प्रश्नही सुटणार आहे.

40 दिवस तहान भागणार
भुसावळ शहराला तापीपात्रातील बंधार्‍यातून पाणीपुरवठा केला जातो. या बंधार्‍यात सुमारे 39 ते 42 दिवसांचा साठा करता येतो. गेल्या पंधरवड्यात बंधार्‍याची जलपातळी घसरली. यानंतर पालिकेने हतनूर प्रशासनाकडे आवर्तनाची मागणी केली होती. यानुसार हतनूर धरणातून रविवारी 1200 क्यूसेसचे आवर्तन सोडण्यात आले आहे. बुधवारी रात्री वा गुरुवारी सकाळपर्यंत आवर्तनाचे पाणी पालिकेच्या बंधार्‍यात पोहोचणार आहे. बंधार्‍यातील जलसाठा अल्प असल्याने नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे मात्र पाणी बंधार्‍यात आल्यानंतर अधिक दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पाईप लाईन दुरुस्ती गरजेची
बंधार्‍यात जलसाठा वाढल्यास अशुध्द पाण्याचा प्रश्न निकाली निघेल मात्र शहरातील अनेक भागात पाईप लाईन गळतीची डोकेदुखी आहे व गळती शोधण्याचे आवाहन यंत्रणेपुढे आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे अपेक्षित आहेत अन्यथा अशुध्द पाणी पाईप लाईनमध्ये शिरुन पुन्हा अशुध्द पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. यामुळे पालिका प्रशासनाने उन्हाळ्यातील जलजन्य आजार रोखण्यासाठी आत्ताचे पाईप लाईनचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करणे अपेक्षित आहे.

सध्या नऊ दिवसाआड पाणी : केवळ सहा टँकर
शहरातील पालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रावर गत गुरुवार ते शनिवार या तीन दिवस वारंवार वीजपुरवठा खंडीत झाल्याने रोटेशन बिघडले. पालिकेने एक दिवस उशिराने पाणीपुरवठा करण्याचे जाहिर केले होते मात्र अनेक भागात नऊ ते दहा दिवस झाले तरीदेखील पाणीपुरवठा झालेला नाही. शहरात पालिकेचे केवळ सहा टँकर आहेत. यातून पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. यामुळे आता बर्‍याच भागांना माजी नगरसेवक व समाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून टँकरव्दारे पाणीपुरवठा होत आहे.

बुस्टर पंप कार्यान्वीत होण्याची अपेक्षा
शहरातील प्रभाग क्रमांक 24 मधील महेश नगर, साने गुरूजी नगरात बुस्टर पंपाची काम पूर्ण झाले आहे मात्र केवळ वीजपुरवठ्याअभावी पंप सुरू झालेला नाही. वीज कनेक्शन मिळाल्यास या भागात पूर्ण दाबाने पाणी मिळेल मात्र वीज कंपनी डीपी घेण्यासाठी आग्रह धरून आहे तर पालिकेसाठी ही बाब खर्चिक आहे. पाणीपुरवठा अभियंता सतीश देशमुख म्हणाले की, आम्ही कोटेशन मागवले आहे व ते आल्यानंतर प्रश्न सुटेल मात्र वीज कंपनीने कनेक्शन दिल्यास लागलीच प्रश्न सुटणार आहे. दरम्यान, भुसावळ नगरपालिका, मध्य रेल्वे व दीपनगर औष्णिक केंद्रासाठी रविवारी हतनूर धरणातून 1200 क्युसेसने सोडलेल्या आवर्तनाची पाणी बुधवारी रात्रीपर्यंत बंधार्‍यात दाखल होण्याची शक्यता आहे.


कॉपी करू नका.