आमदार एकनाथराव खडसेंना धमकी : मंत्री गिरीश महाजन म्हणाले…!

0

भुसावळ : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार एकनाथराव खडसे यांना अमेरीका, युपीतील विविध क्रमांकातून तब्बल चारर ते पाच वेळा कॉल करून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली तर आमदार खडसेंच्या सुरक्षेतही पोलिसांनी वाढ केली. दरम्यान, धमकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आमदार खडसे हे ज्येष्ठ व मोठे नेते आहेत त्यामुळे धमकी मिळाल्याचा भाग पोलिसांच्या तपासाचा भाग आहे.

चौकशीची मागणी करावी : मंत्री महाजन
मंत्री महाजन म्हणाले की, राज्याचा गृहमंत्री नाही त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ होईल की नाही, याबद्दल जास्त काही सांगू शकत नाही. त्यांना फोन कोठून आले? कुणी केले? हा सर्व चौकशीचा भाग आहे. परंतू दाऊदचे आणि त्याच्या गँगच्या सदस्यांचे यांच्याशी काही संबंध असल्याचे कुठे दिसत नाही. तसेच, खडसे भाजपामध्ये आले म्हणून दाऊद त्यांना काही धमक्या देईल, अशी काही परिस्थिती नाही.

मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल
आमदार एकनाथ खडसे यांना आतापर्यंत धमकीचे चार ते पाच फोन आले आहेत. वेगवेगळ्या नंबरवरुन एकनाथ खडसे यांना हे धमकीचे फोन आले आहेत. त्यामुळे जळगावच्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. या धमकीचे कारण अद्याप समोर आलेला नाही.

नाथाभाऊ म्हणाले ; अशा धमक्यांना भीक घालत नाही
ज्येष्ठ नेते व आमदार खडसे म्हणाले की, अशा धमक्यांना आपण कदापि भीक घालत नाही. सातत्याने फोन आल्याने आपण या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. या घटनेचा राजकीय संबंध असेल, असे मला वाटत नाही, मात्र पोलीस चौकशी करीत असल्याने त्यातून तथ्य बाहेर येईल. अशा धमक्या मला अनेक वेळा आल्या आहेत त्यामुळे परिवारात कुठेही भीतीचे वातावरण नाही. खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांना सुचित केले आहे आणि आम्हीही आवश्यक ती काळजी घेत आहोत.


कॉपी करू नका.