यावल शहरात बालाजी महाराज रथोत्सव उत्साहात

118 वर्षांची परंपरा : चोपडा रस्त्यावर ओढल्या बारागाड्या

0

Balaji Maharaj Rathotsav in Yaval city यावल : सुमारे 118 वर्षांची परंपरा असलेल्या येथील श्री बालाजी महाराजांचा रथोत्सवाच्या मिरवणुकीस मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता सुरवात झाली. शहरातील येथील प्रसिद्ध श्री महर्षी व्यास मंदिराच्या पायथ्यालगतच्या हरीता-सरीता नद्यांच्या संगम पात्रातून पारंपरीक पध्दतीने पूजा-अर्चा करीत भाविक-भक्तांनी रथ ओढला. साडेसात वाजता हा रथ महाराणा प्रताप नगराजवळ दाखल झाला. तत्पूर्वी चोपडा रस्त्यावरून खंडेराव महाराजांच्या बारागाड्या उत्साहात ओढण्यात आल्या. या यात्रोत्सवात हजारोंच्या संख्येत भाविक, भक्तांची उपस्थिती होती. बुधवारी पहाटे या रथोत्सवाची सांगता झाली.

रथोत्सवाला 118 वर्षांची परंपरा
यावल शहरातील रथोत्सवाला 118 वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी श्री हनुमान जयंतीनिमित्ताने शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराच्या पायथ्याशी हरीता- सरीता नदीत यात्रेचे आयोजन केले जाते. मंगळवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात रथ पूजन कार्यक्रम पार पडला व रथ ओढण्यास सुरवात झाली. रथात सुनील महाराज, बाळू महाराज, महेश बयाणी यांची उपस्थिती होती. रथोत्सव मार्गस्थ होत असताना पूजजा-अर्चा व नारळांचा स्विकार भटजी मंडळींकडून करण्यात आला. भालदार व चोपदार म्हणून रात्रभर रथ सेवेकरीता शिवाजी चौधरी, विलास कोलते, सुरेश चौधरी आणि तोताराम चौधरी हे विशेष वेशभुषेत तैनात होते. या रथाचे शहरातील महाराणा प्रताप नगरात आगमन झाल्यावर रथाचे स्वागत आमदार शिरीष चौधरी, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, हाजी शब्बीर खान मोहम्मद खानसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व शांतता समिती सदस्यांनी केले. रथोत्सवात फैजपूर उपविभागीय कार्यालयाच्या सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, सहायक पोलीस निरीक्षक हरीष भोये, विनोदकुमार गोसावी, पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, मुजफ्फर खान सह सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

वहनांनी वेधले लक्ष
श्री बालाजी महाराज रथोत्सवात विशेष आर्कषण म्हणजे डोक्यावर तब्बल आठ किलो वजनाचे मोरपंख असलेले मुकूट लावून तालबध्द पध्दतीने पारपांरीक वाद्यावर नृत्य करणारे वहन. जळगाव येथील वहन परंपरा जोपासणारे कलावंत सचिन सोनार, साई धनगर, योगेश झाल्टे, जितेंद्र कोळी, विजय शिरसाट या तरूणांनी लक्ष वेधले होते.

उत्साहात ओढल्या बारागाड्या
चोपडा रस्त्यावर बडगुजर समाजाच्या वतीने खंडोबा महाराजांच्या यात्रेचे आयोजन केले जाते. महाराणा प्रताप नगरात खंडोबा महाराजाच्या मंदिरात भंडारा उधळत बारागाड्या ओढण्यात आल्या. चोपडा रस्त्यावरून भगत निखील गजानन बडगुजर व बगले प्रवीण कैलास बडगुजर, भास्कर चौधरी यांनी उत्साहात बारागाड्या ओढल्या. प्रसंगी मोठ्या संख्येत भाविक-भक्तांनी चोपडा रोड सह महाराणा प्रताप नगर, हडकाई नदीपात्रात प्रचंड गर्दी झाली.


कॉपी करू नका.