50 हजारांची लाच भोवली : म्हसदी ग्रामसेवक धुळे एसीबीच्या जाळ्यात

महिला सदस्यांच्या पतीकडून घेतली लाच : सरपंचांच्या वाढल्या अडचणी

0

50 thousand bribe: Mhasadi gram sevak Dhule in ACB’s net साक्री : ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांच्या वॉर्डात 12 लाखांची विकासकामे देण्यासाठी 20 टक्क्यांप्रमाणे दोन लाख 40 हजारांची लाच मागून पहिल्या टप्प्यात 50 हजारांची लाच स्वीकारताना साक्री तालुक्यातील म्हसदी (प्र. नेर), ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मेघशाम रोहिदास बोरसे यांना धुळे एसीबीने गुरुवारी अटक केल्याने लाचखोर हादरले आहेत. या प्रकरणात आता म्हसदी सरपंच यांच्यादेखील अडचणी वाढल्या आहेत.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार हे मौजे म्हसदी (प्र. नेर) येथील रहिवासी आहेत तर त्यांच्या पत्नी म्हसदी (प्र.नेर) ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत. तक्रारदाराच्या पत्नी अशिक्षित असल्याने त्यांच्या वॉर्डात विकासकामे मंजूर होण्याकरीता त्यांच्या पत्नीच्या वतीने तक्रारदार हे सरपंच व ग्रामसेवक मेघशाम बोरसे यांना वेळोवेळी भेटुन पाठपुरावा करीत होते. तक्रारदार व त्यांच्या पत्नीने ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक बोरसे यांची भेट घेत त्यांची पत्नी सदस्य असलेल्या वॉर्डातील उर्दू शाळेस संरक्षण भिंत, शाळेच्या आवारात पेव्हर ब्लॉक व शाळेच्या मुला मुलींकरीता सुलभ शौचालयाच्या कामास मंजुरी मिळणेकरीता अर्ज दिला होता. यावेळी असता ग्रामसेवक बोरसे यांनी अंदाजे 12 लाखांच्या कामासाठी सुमारे 20 टक्के प्रमाणे दोन लाख 40 हजार रुपये काम घेणार्‍या इच्छूक ठेकेदाराकडून आगावू कमिशन मागितले होते.

ग्रामपंचायत कार्यालयातच ग्रामसेवक जाळ्यात
बोरसे यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी 20 फेब्रुवारी 2024 रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. पडताळणी ग्रामसेवक मेघशाम बोरसे यांनी दोन लाखांची लाच मागून 50 हजारांचा पहिला हप्ता स्विकारण्याचे मान्य केले होते. गुरुवार, 25 रोजी सापळा रचल्यानंतर ग्रामसेवक बोरसे यांनी म्हसदी (प्र.नेर) ग्रामपंचायत कार्यालयात 50 हजारांची लाच घेताना पकडण्यात आले.

यांनी केला सापळा यशस्वी
धुळे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांच्या पथकाने सापळा यशस्वी केला.


कॉपी करू नका.