विसरवाडी हादरले : आठवडे बाजारात भरदिवसा पतीने केला पत्नीचा खून
Visserwadi shook : Husband killed his wife in broad daylight in the weekly market विसरवाडी (9 ऑगस्ट 2024) : आठवडे बाजारात आलेल्या पत्नीवर धारदार हल्ला केल्याने पत्नीचा मृत्यू झाला. गुरुवारी शहरातील आठवडे बाजारात घडलेल्या घटनेने नवापूर तालुक्यात खळबळ उडाली. बबिता अशोक गावीत (25) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे तर आरोपी अशोक तार्या गावित (रा.ढोरपाड्या) यास तरुणांनी पकडल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. कौटूंबिक वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.
कौटूंबिक वादातून पत्नीला संपवले
सूत्रांच्या माहितीनुसार बबिता व पती अशोक तार्या गावित (रा.ढोरपाड्या) यांच्यात सतत वाद होत असल्याने पीडित महिला बबिता या दोन महिन्यांपासून दापूर येथे आई-वडिलांकडे आल्या होत्या. गुरुवारी विवाहिता विसरवाडी येथे गुरुवारच्या आठवडे बाजारात आल्यानंतर आरोपी पतीने पत्नीच्या छातीवर व पोटावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली. तिला तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात नेऊन प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तेथे उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू झाला.
बाजारात या घटनेवेळी काही तरुणांनी धाडस दाखवत हल्लेखोर पतीस पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, अत्यवस्थ अवस्थेतील विवाहितेला तातडीने उपचारासाठी विसरवाडी रुग्णालयात व तेथून नंदुरबार रुग्णालयात हलवण्यात आले असता तिचा मृत्यू झाला.