दसनूरला महादेत्र यात्रोत्सवानिमित्त ओढल्या बारागाड्या
सिंगनूर (5 सप्टेंबर 2024) : येथून जवळच असलेल्या दसनूर येथे मंगळवार, 3 सप्टेंबर रोजी उमेश्वर महादेवाचा यात्रोत्सव उत्साहात पार पडला. पोळ्याचा उत्सव म्हणून आयोजित या यात्रेचत बारागाड्या आकर्षण ठरल्या. सायंकाळी 5.30 वाजता भगत बाळू कोळी यांनी बारागाड्या ओढल्या. त्यांना बगले प्रभाकर कोळी, दीपक चौधरी, त्र्यंबक चौधरी, नाशिक यांनी साथ दिली. यावेळी गावकर्यांनी मोठी गर्दी केली. बारागाडया ओढण्याआधी गावातील देवी-देवतांना नैवेद्य दाखविण्यात येवून पूजा करण्यात आली.
यात्रोत्सवात लाखोंची उलाढाल
यात्रेत खाद्यापदार्थ, खेळणी तसेच विविध व्यावसायिकांची संसारोपयोगी वस्तूंची दुकाने थाटली. महादेव मंदिरात लोक कला वही गायन कार्यक्रमाचे दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले.. परिसरातील वह-गायन कलावंतांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकरी वर्गामध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे. निंभोरा पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक हरीदास बोचरे, पोलीस उपनिरीक्षक दुर्योधन सावळे, पोलीस अंमलदार सुरेश अढांयगे, रशीद तडवी, किरण जाधव, जितेंद्र नेमाडे, अतुल चौधरी, विजय चौधरी, रवींद्र चिमणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. यात्रोत्सव यशस्वीतेसाठी सरपंच मयूर महाजन, महेश चौधरी, पोलीस पाटील दीपक चौधरी, तुकाराम महाजन, विशाल पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.