भुसावळ शहरात श्री विसर्जन उत्साहात

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकरच या !


भुसावळ (19 सप्टेंबर 2024) : 14 विद्या व 64 कलांचा अधिपती असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाला मंगळवारी शहर व भुसावळ विभागात मोठ्या उत्साहपूर्ण व भक्तीमय वातावरणात भाविकांनी निरोप दिला. शहरातील मंडळातर्फे यंदा मोठ्या प्रमाणावर फुलांच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली. शहरातील तापी नदीच्या दोन्ही बाजूच्या तिरावर लहान मूर्तीचे विसर्जन करण्यात आले तर मोठ्या मूर्तीचे गारखेडा येथील वाघूर नदीच्या बॅकवॉटरमध्ये विसर्जन करण्यात आले.

प्रबोधनात्मक संदेशातून जनजागृती
भुसावळ शहरात आठवडे बाजारातील नृसिंग मंदिरापासून मंगळवारी दुपारी विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. सुमारे 11 तास विसर्जन मिरवणुकीचा उत्साह कायम होता तर रात्री 12 वाजेच्या सुमारास डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी वाद्य बंद करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर मुख्य मिरवणूक मार्गावर असलेल्या पाच मंडळांनी वाद्य बंद करुन मिरवणूक काढली. यंदा शहरातील मंडळांनी मिरवणुकीत विविध सामाजिक संदेश दिले. त्यात मित्रा आपल्या बहिणीसाठी वाघ होतोस, तसा इतरांच्या बहिणीसाठी पिसाळलेला कुत्रा होऊ नको, मुलींनो कलीयुग आहे सोबत शस्त्र ठेवा म्हणजे वस्त्रहरण होण्याची वेळ येणार नाही, बलात्कार्‍यांना फाशी झालीच पाहिजे आदी संदेश दिले.

मोठ्या मूर्तीचे पहाटेपर्यंत विसर्जन
शहरातील गणेशोत्सवात यंदा 18 ते 26 फूट उंचीच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्यानंतर रात्री एक वाजेनंतर वाघूर धरणात बॅकवॉटरमध्ये क्रेनचा वापर करून मोठ्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. या ठिकाणी आमदार संजय सावकारे रात्री उशिरापर्यंत उपस्थित होते.

महिलांचा मिरवणुकीत सक्रिय सहभाग
यंदाच्या गणेशोत्सवात महिलांचाही मोठा सहभाग होता. त्यात जय मातृभूमी प्रतिष्ठान, जय गणेश फाऊंडेशन, शिवमुद्रा प्रतिष्ठान, लेवा प्रतिष्ठान, अष्टभुजा मंडळ, जय लेवा ग्रुप नवरत्न मंडळ, अलंकार मंडळ, चैतन्य मंडळ आदींसह बहूतांश सर्वच मंडळांमध्ये महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

पालिकेकडून काटेकोर व्यवस्थापन
तापी नदीच्या पात्रातील राहुल नगर, यावल भागाकडील घाटावर प्रशासनाने बॅरीकेटस लावले तर राहुल नगर घाटावर मूर्तीची पूजा करीत जीवन रक्षकांच्या हाती मूर्ती देण्यात आली तर यावलरोडकडील भाग, फिल्टर हाऊस घाट, महादेव घाट आदी भागात भाविकांनी स्वत: मूर्ती विसर्जीत केल्या. या ठिकाणी पालिकेने 80 पट्टीचे पोहणारे जीवनरक्षक तैनात केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य संकलीत करण्यात आले. पालिका व पोलिस प्रशासनाने तापीपात्रासह विसर्जन मिरवणूकीत पथदिवे, बॅरिकेट्स, आरोग्य सेवा, रुग्णवाहिका आदींची उत्तम सुविधा केली.

रात्रीच केली पथकाने स्वच्छता
मिरवणुकीत जामा मशिदीजवळ फुलांच्या पाकळ्या, रंगेबिरंगी कागदांचा ढिग साचला होता. पालिकेच्या स्वच्छता विभागाने रात्री दोन वाजेनंतर जामा मशीद भागातील स्वच्छता केली तर मिरवणूक मार्गावरील जामनेररोड, अष्टभुजा देवी मंदिर, ब्राह्मण संघ, जवाहर डेअरी भाग या मार्गावरील गुलालही उचलण्यात आला.

सामाजिक संस्थांतर्फे निर्माल्य संकलन
यावल रोडवर माजी नगरसेवक निर्मल कोठारी व साईजीवन गणेश मंडळ, पालिका प्रशासन, श्री संप्रदाय आदींसह शहरातील विविध सामजिक संस्थांनी विविध ठिकाणी निर्माल्य संकलन केले. भाविकांनीही स्वतःहून निर्माल्याचे दान केल्याने मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण टळले.


कॉपी करू नका.