भुसावळात विना परवाना बांधकाम : आठ दुकानदारांना नोटीसा व एका दुकानाला ठोकले सील


सत्ताधार्‍यांना दुसरा हादरा : त्या गाळ्यांचा मालकी हक्क सिद्ध न झाल्यास पालिका लिलाव करून विकणार गाळे ः मुख्याधिकारी

भुसावळ : शहरातील खडका रोडवरील नॅशनल गर्ल्स उर्दू हायस्कूलला लागून सत्तेचा गैरउपयोग करून काहींनी बेकायदा दुकाने बांधण्यात आल्याची तक्रार मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्याकडे करण्यात आल्यानंतर त्यांनी शुक्रवारी पथकासह पाहणी केल्यानंतर आठ दुकानदारांना मालकी हक्काबाबत कागदपत्रे सात दिवसांच्या आत सादर करण्याची नोटीस बजावली तर एका दुकानाला सील लावण्यात आल्याने सत्ताधार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. भुसावळातील अतिक्रमणाचा प्रश्‍न भविष्यात गंभीर वळण घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खडका रोडवरील बेकायदा बांधकाम : दुकानदारांना नोटीसा
पालिका प्रशासनाकडे खडका रोडवरील नॅशनल गर्ल्स उर्दू हायस्कूलला लागून सत्तेचा गैरउपयोग करून काहींनी बेकायदा दुकाने बांधण्यात आल्याची तक्रार मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुषंगाने शुक्रवारी मुख्याधिकार्‍यांनी स्वतः पाहणी करून खातरजमा केली. यावेळी एका रीकाम्या दुकानाला पालिकेने सील ठोकले तर अन्य आठ दुकानदारांना सात दिवसांच्या आत गाळ्याची मालकी सिद्ध करण्याबाबतचे पुरावे सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली. या कारवाईने सत्ताधार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. अतिक्रमण करणार्‍यांमध्ये सत्ताधार्‍यांचा समावेश असल्याचा आरोप होत असल्याने पुढील कारवाईकडे आता लक्ष लागले आहे.


लिलाव करून गाळे विकणार : मुख्याधिकारी
खडका रोडवरील दुकाने अतिक्रमण करून बांधण्यात आल्याची तक्रार आल्यानंतर स्वतः पाहणी केली. एका दुकानाला सील लावण्यात आले असून आठ दुकानदारांना नोटीसा बजावण्यात आल्याचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार म्हणाले. संबंधित दुकानदारांनी आपल्या दुकानाचा मालकी हक्क सिद्ध न केल्यास जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठवून गाळ्यांचा लिलाव करण्यात येईल, असेही मुख्याधिकारी म्हणाले.

भुसावळात अतिक्रमणावरून राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे
भुसावळात थेट सत्ताधार्‍यांकडून अतिक्रमण होत असल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे केल्या जात असून त्या अनुषंगाने मुख्याधिकारी न डगमगता कारवाईदेखील करीत असल्याने सुज्ञ जनतेतून या कृतीचे स्वागत होत आहे मात्र अतिक्रमण करणारा कुणीही असो त्याचेही अतिक्रमण निघायला हवे, असा सूरही जनतेत आहे. भुसावळातील मरीमाता मंदिरामागील मंदिरामागील दुकानांच्या अतिक्रमणात सत्ताधार्‍यांवर आरोप झाला तर खडका रोडवरील न दुकानांमध्येही सत्ताधारी पक्षाच्या एका जवाबदार पदाधिकार्‍याशी संबंध जोडला जात असल्याने भविष्यात शहरात अतिक्रमावरून राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

दुकानदारांनीच बांधली दुकाने : शेख चिराग
नॅशनल गर्ल्स उर्दू हायस्कूलबाहेर सुरूवातीला टपर्‍या लावणार्‍या लोकांनी स्वखर्चाने दुकानांचे बांधकाम केले असल्याचे संस्थेचे चेअरमन शेख चिराग शेख गुलाब यांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !