उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मामांची होणार चौकशी : किरीट सोमय्यांच्या दाव्याने खळबळ
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मामांची चौकशी होणार असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सोमय्या म्हणाले की, येणार्या चार दिवसात चार ठिकाणी राज्याच्या नेत्यांची प्रकरणं बाहेर येतील. या ठिकाणी ईडी कारवाया करेल व तपास यंत्रणा कारवाई करतील. त्यात अजित पवार यांचे मामा आणि बिझनेस पार्टनर यांचीही चौकशी होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
मलिकांना जाग आली का?
यावेळी त्यांनी नवाब मलिकांना लक्ष्य केलं. ते म्हणाले, नवाब मलिकांना आत्ता जाग आली का ? वक्फ बोर्डाच्या घोटाळ्यांचा सगळा तपास पूर्ण होणार आहे. येत्या दोन ते चार दिवसांत अजित पवारांच्या अवतीभोवती असलेल्या सगळ्यांच्या चौकशा होणार आहे, असा दावा त्यांनी केला.


रझा अकादमीच्या नेत्यांची अटक का नाही?
राज्यातल्या हिंसाचारावरही सोमय्यांनी वक्तव्य केलं. ते म्हणाले, शिवसेनेचा नेता नांदेडमध्ये भाषण करतो. रझा अकादमीच्या एकाही नेत्याची अटक का नाही ? जे मोर्चे निघाले ते काय आरएसएसनं काढले ? हिंदू हा मुद्दा यांच्यासाठी राहिला नाही. छत्रपतींचा महाराष्ट्र हे मान्य करणार नाही. हिंदूंची दुकाने तोडली आणि जाळली मात्र हे संजय राऊतांना दिसत नाही. सुमित ठक्करनं ठाकरे सरकारचा घोटाळा काढला, तर 10 दिवस तुरूंगा. मात्र मोर्चे काढणारे मोकळे. हे धंदे चालणार नाहीत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, आगमी चार दिवसांत 4 ठिकाणी राज्याच्या नेत्यांची प्रकरणं बाहेर येतील. या ठिकाणी ईडी कारवाया करेल. तपास यंत्रणा कारवाई करतील. त्यात अजित पवार यांचे मामा आणि बिझनेस पार्टनर यांचीही चौकशी होईल. वक्फ बोर्डाच्या घोटाळ्यांचा सगळा तपास पूर्ण होणार असल्याचेही सोमय्या म्हणाले.