सोशल मिडीयातून वातावरण दूषित करणार्यांचा प्रयत्न हाणून पाडा : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे
जळगाव : सोशल मिडीयाच्या माध्यमातून कोणी भडकावत असेल तर त्याचा प्रयत्न हाणून पाडा शिवाय वातावरण खराब होणार नाही, याची काळजी घेण्यासह अनुचित प्रकार घडू नये म्हणूून सर्वधर्मीय सदस्यांनी काळजी घ्यावी शिवाय कुणी काही अनुचित प्रकार करत असेल, किंवा भावना भडकावित असेल तर पोलिसांना कळवल्यास तातडीने कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही येथे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली. त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ अमरावतीत काही संघटनांनी काढलेल्या मोर्चात दगडफेक केल्याने हिंसक वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉलमध्ये रविवारी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी अनुचित प्रकार होणार नाही असे आश्वासन सदस्य, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांनी दिले.
शहरात शांततेची ग्वाही
जिल्हा पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉलमध्ये रविवारी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. जळगाव शहरात सर्व सण उत्सव जळगावातील सर्व समाजबांधव एकत्रीपणे साजरा करत आहे. त्रिपुरा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात काहीही अनुचित प्रकार घडणार नाही. शहरात शांतता अबाधीत रहणार आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी देखील प्रयत्नशील राहतील, अशी आमदार राजूमामा भोळे आणि महापौर जयश्री महाजन यांनी ग्वाही दिली.


गर्दी होणार नाही याची काळजी घेणार
सोमवार, 15 रोजी श्रीराम मंदीराचा रथ काढला जाणार आहे. त्यामुळे यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यंदा रथ सकाळी निघाल्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या आत रथ पुन्हा मंदिराजवळ पोहोचवण्याचे नियोजन आहे. गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे असे पाटील यांनी सांगीतले तर सन 1970 पासून नियाज अली यांनी सुरु केलेली प्रथा जोपासली जाणार आहे, असे सांगितले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, आमदार राजूमामा भोळे उपमहापौर कुलभुषण पाटील, रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा, अयाज अली, सर्व पोलिस ठाण्यांचे निरीक्षक, शांतता कमिटीचे सदस्य, विविध समाजबांधव, पोलिस पाटील आदी उपस्थित होते.