एफएमजीई परीक्षेविना वैद्यकीय प्रॅक्टीस : जळगावसह धुळ्यातील डॉक्टरांविरोधात सीबीआयने दाखल केला गुन्हा
देशातील 73 डॉक्टरांवर कारवाई : विविध राज्यातील मेडिकल कौन्सिलचे शासकीय अधिकारी आणि दलालही रडारवर !
Medical practice without FMGE exam : CBI files a case against doctors in Jalgaon and Dhule जळगाव : एफएमजीई परीक्षेविना वैद्यकीय प्रॅक्टीस करणार्या जळगावसह धुळ्यातील डॉक्टरांसह देशातील एकूण 73 डॉक्टरांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केल्याने वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विदेशात एमबीबीएस झालेल्या डॉक्टरांना भारतात प्रॅक्टीस करावयाची असल्यास त्यांना राष्ट्रीय वैद्यकीय परीषदेची ‘फॉरेन मेडिकल गॅज्युएट इंटरन्स’ (एफएमजीई) ही परीक्षा पास होणे गरजेचे आहे मात्र ही परीक्षा नापास होऊनही रजिस्ट्रेशन करणार्या देशातील 73 डॉक्टरांविरुद्ध 21 डिसेंबर रोजी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. यात जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील प्रत्येकी एका डॉक्टरचा समावेश आहे.
देशभरात 91 ठिकाणी छापेमारी
काही दिवसांपूर्वी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एफएमजीई आवश्यक परीक्षेत नापास झाल्यानंतरही रजिस्ट्रेशन करणार्या 73 डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी दिल्लीच्या सीबीआय पथकाने देशभरातील 91 ठिकाणी छापे टाकले होते. सीबीआयच्या वेबसाईटवर असलेल्या एफआयआर नुसार जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील डॉ.दीपक अशोक पाटील (सुप्रभा कॉलनी धुळे रॉड, अमळनेर) डॉ.निलेश किशोर पाटील (चिमठाणा, ता.शिंदखेडा जि.धुळे) या दोघांचा समावेश आहे. या दोघांनी चीनमधून एमबीबीएस पूर्ण केले आहे परंतु एफएमजीई परीक्षा नापास झाल्यानंतरही दोघांनी रजिस्ट्रेशन करून प्रॅक्ट्रीस सुरू केल्याचा आरोप आहे.
शासकीय अधिकार्यांसह खाजगी दलाल रडारवर
14 राज्यांतील मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे अज्ञात शासकीय अधिकारी आणि खाजगी व्यक्ती देखील सीबीआयच्या रडारवर आहेत. परदेशात वैद्यकशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर सर्व डॉक्टरांना भारतात सराव करण्यासाठी स्क्रीनिंग चाचणी उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. गेल्या काही वर्षांत परदेशातून परतलेल्या डॉक्टरांनी ही परीक्षा उत्तीर्ण न करता विविध राज्यांच्या वैद्यकीय परीषदेत नोंदणी करून प्रॅक्टिस सुरू केल्याचा आरोप आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसच्या अध्यक्षांनी यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. त्यानंतर विभागाच्या केंद्रीय सचिवांनी सीबीआयला चौकशीसाठी पत्र लिहिले. देशभरातील 73 डॉक्टरांची नावे समोर आली होती. त्यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील डॉ. दीपक आणि डॉ. निलेश पाटील यांची नाव समोर आली होती. दरम्यान, सीबीआयने 120 ब, 420,467,468, 471 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.


