बोरखेडा हत्याकांड : भुसावळ सत्र न्यायालयात तीन साक्षीदारांची सरतपासणी

आरोपीतर्फे जामीन अर्ज मागे आजही होणार खटल्याबाबत सुनावणी


Borkheda massacre : Examination of three witnesses in Bhusawal Sessions Court भुसावळ : राज्यात गाजलेल्या रावेर तालुक्यातील बोरखेडा बु.॥ येथील हत्याकांडाच्या नियमित सुनावणीला भुसावळ सत्र न्यायालयात सोमवार, 29 मे पासून नियमित सुनावणी सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्वल निकम यांनी सोमवारी तीन साक्षीदारांची न्या.आर.एम.जाधव यांच्या न्यायासनासमोर सरतपासणी केली. हत्याकांडातील फिर्यादी, घटनास्थळाचे पंच, सर्कल अधिकारी यांची यावेळी सरतपासणी घेण्यात आल्यानंतर संबंधितांनी घटनेचा क्रम यावेळी सांगितला.

असे आहे चौघा भावंडांच्या हत्येचे प्रकरण
15 ऑक्टोंबर 2020 रोजी रावेर तालुक्यातील बोरखेडा शिवारातील एका शेतात झोपडीत आई-वडिलांसह वास्तव्यास असलेल्या चौघा भावंडांची हत्या करण्यात आली होती. सालदार असलेला तक्रारदार पत्नी व एका लहान मुलाला घेवून मध्यप्रदेशातील मूळ गावी 14 ऑक्टोबर 2020 रोजी गेला असता आरोपी महेंद्र सीताराम बारेला (रावेर तालुका) याने या कुटूंबातील 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केला व त्याचवेळी भावंडांना जाग आल्यानंतर 11 व 8 व तीन वर्षीय भावंडांसह पीडीतेची कुर्‍हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या केली. हे हत्याकांड उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अत्यंत बारकाईने या गुन्ह्याचा तपास करीत आरोपी निष्पन्न केला. आरोपीला अटक केल्यानंतर संशयित अद्यापही कारागृहातच आहे.

भुसावळ न्यायालयात तीन साक्षीदारांची सरतपासणी
विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्वल निकम यांनी सोमवारी दुपारी या हत्याकांडातील प्रमुख फिर्यादी, घटनास्थळाचे पंच, सर्कल अधिकारी या प्रमुख मुख्य तीन साक्षीदारांची न्या.आर.एम.जाधव यांच्या न्यायासनापुढे सरतपासणी घेतली. यावेळी प्रत्येक साक्षीदाराने घटनाक्रम सांगितला. अ‍ॅड.निकम यांनी सरकारी वकील अ‍ॅड.प्रवीण भोंबे यांचे सहकार्य लाभले. दरम्यान, मंगळवारीदेखील तीन साक्षीदारांची तपासणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आरोपीचा जामीन अर्ज मागे
चौघा भावंडांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी महेंद्र सीताराम बारेला (रावेर तालुका) याच्या जामिनावर अ‍ॅड.एस.आर.पाल यांनी जामीन अर्ज दाखल केला होता मात्र सोमवारी त्यांनी तो मागे घेतला.


कॉपी करू नका.