पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्तींसह ओमर अब्दुल्ला नजरकैदेत
जम्मू काश्मिरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ ; अनेक ठिकाणी कलम 144 लागू
नवी दिल्ली- सोमवारी मध्यरात्रीपासून श्रीनगर आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू झालं असून प्रमुख राजकीय नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे तसेच राज्यातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली असून पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्तींसह ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, काश्मीरमधील लँडलाइन फोन सेवाही बंद करण्यात आली असून सोमवारी सकाळी 9.30 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकीनंतर काश्मीर खोर्यातील प्रश्नावर चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत घेतलेला निर्णय आणि काश्मीरमधील सध्याची परिस्थिती यावर सरकार संसदेत उत्तर देणार आहे.
राज्यभरात सुरक्षा यंत्रणा तैनात
संपूर्ण राज्यात सुरक्षेच्या यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. लखनपूरपासून काश्मीरच्या घाटीपर्यंत प्रत्येक ठिकाणी सुरक्षा यंत्रणा नजर ठेऊन आहेत. आतापर्यंत काश्मीरमध्ये जवानांच्या 40 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सध्या जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद आहे. मात्र त्याआधी नजरकैदेत असलेल्या अब्दुल्ला आणि मुफ्तींनी ट्विट्स केले आहे.