भुसावळातील यावल रोडवरील अतिक्रमण निघाले
पालिकेच्या अल्टीमेटमनंतर अतिक्रमित व्यावसायीकांनी हटवल्या टपर्या : यावल रस्त्याने घेतला मोकळा श्वास : मोहिमेत सातत्य ठेवण्याची अपेक्षा
भुसावळ : शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर वारेमाप प्रमाणात झालेल्या अतिक्रमणानंतर रहदारीच्या निर्माण झालेल्या प्रश्नानंतर मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी शहरातील अतिक्रमण हटवण्याचा इशारा गुरुवार, 10 डिसेंबर रोजी मरीमाता मंदिरामागील अतिक्रमण हटवताना दिला होता. त्यानुसार गुरुवारी व शुक्रवारी यावल व जळगाव रस्त्यावरील अतिक्रमण करून व्यवसाय करणार्या व्यावसायीकांना पालिकेच्या पथकाने अतिक्रमण काढण्याची समज दिल्यानंतर कारवाईच्या भीतीने व्यावसायीकांनी शुक्रवारी सकाळीच आपापल्या अतिक्रमीत टपर्या हलवल्याने यावल रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे तर जळगाव रस्त्यावर थाटण्यात आलेल्या टपर्या हलवण्याची प्रक्रिया दुपारपर्यंत सुरू होती.
साहित्य जप्तीच्या भीतीने स्वतःच काढले अतिक्रमण
गुरुवारी व शुक्रवारी पालिकेचे उपमुख्याधिकारी महेंद्र कातोरे, कर अधीक्षक रामदास म्हस्के, सुभाष ठाकूर, प्रदीप पवार, वसंत राठोड, सुरज नारखेडे यांच्यासह विविध विभागांच्या प्रमुखांनी यावल व जळगाव रस्त्यावरील बेकायदा रस्ता अडवून टपरी ठेवलेल्या व्यावसायीकांना अतिक्रमण हटवण्याची सूचना केली अन्यथा पालिका कारवाई करणार असल्याचा इशारा दिला. पालिकेच्या पथकाकडून कारवाई झाल्यास टपरी व साहित्य जप्त होणार असल्याची भीती असल्याने व्यावसायीकांनी स्वतःहून रस्त्यावर ठेवलेल्या टपर्या, हातगाड्या हलवल्याने यावल रस्त्याने मोकळा श्वास घेतला तर जळगाव रस्त्यावरील अतिक्रमीत व्यावसायीकांकडून टपर्या काढण्याची प्रक्रिया दुपारी सुरू होती.


