भुसावळात भाजपात उरले केवळ 14 नगरसेवक : राष्ट्रवादीचे वाढले बळ
भुसावळ ऐवजी समर्थकांचा जळगावात प्रवेश : भुसावळातील राजकारण रंजक वळणावर
भुसावळ : भाजपाला रामराम करीत राष्ट्रवादीत दाखल झालेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरूवात केली असून भाजपाला पुरता धडा शिकवण्यासाठी कंबरही कसली आहे. जळगावच्या लेवा पाटीदार भवनात शनिवारी भुसावळातील तब्बल 53 भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी व खडसे समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. विशेष म्हणजे पालिका निवडणुकीत भाजपा चिन्हावर 25, तीन अपक्ष व एक शिवसेना नगरसेवक निवडून आले होते तर जनाधारचे 19 नगरसेवक निवडून आले होते. आजमितीला केवळ 14 नगरसेवक उरल्याने भाजपासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. खडसे समर्थक नगरसेवकांनी थेट राष्ट्रवादीत प्रवेश टाळला असलातरी त्यांच्या परीवारातील सदस्यांनी हातावर मात्र घड्याळ बांधले आहे.
भाजपात उरले हे नगरसेवक
आजघडीला भाजपामध्ये उपनगराध्यक्ष रमेश नागराणी, नगरसेवक युवराज लोणारी, मंगला आवटे, पुष्पा बतरा, महेंद्रसिंग ठाकूर, निर्मल कोठारी, प्रा.दिनेश राठी, प्रितमा गिरीश महाजन, दीपाली परीक्षित बर्हाटे, सोनी संतोष बारसे, राजेंद्र नाटकर, अनिता सतीश सपकाळे व मनोज बियाणी, चंद्रशेखर अत्तरदे हे दोन स्वीकृत सदस्य मिळून 14 नगरसेवकांचा समावेश आहे.


यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
माजी नगरसेवक चिराग कुरेशी, जलील कुरेशी, शेख पापा शेख कालू, शेख निवाम, इस्माईल अकबर मेमन, अजीम खान खलील खान आदींसह भुसावळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या पत्नी भारती भोळे, स्वीकृत नगरसेवक प्रा. सुनील नेवे, भाजपचे गट नेते मुन्ना तेली यांचे चिरंजीव आशिक तेली, भाजपचे माजी शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, माजी शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष अनिकेत पाटील, माजी उपनगराध्यक्षा शे. सईदा यांचे पती शेख शफी आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पालिका निवडणुकीला अद्याप आठ-नऊ महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे यापूर्वी भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या खडसे समर्थक नगरसेवकांनी तूर्त अपात्रतेची कारवाई न होण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश टाळला असलातरी निवडणूक तोंडावर ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील यात शंकाच नाही.
भुसावळ ऐवजी जळगावात प्रवेश
भुसावळातील तेली समाज मंगल कार्यालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला मात्र खडसे समर्थकांनी भुसावळऐवजी जळगावात प्रवेश केल्याने भविष्यात चौधरी गट व खडसे गट कार्यान्वीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.

