मलिकांचा गंभीर आरोप : 14 कोटी 56 लाखांचे प्रकरण देवेंद्र फडणवीसांनी दाबले


मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रात बनावट नोटांचा खेळ सुरू होता व साडे 14 कोटींच्या बनावट नोटा सापडल्यानंतर हे प्रकरण फडणवीस यांनी दाबल्याचा आरोपही राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप कागदपत्रे दाखवून केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधांचा हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, मलिक यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांच्यावर अनेक आरोप केल्याने खळबळ उडाली.

बनावट नोटांचे प्रकरण दाबले
याबाबत मोठा गौप्यस्फोट करताना नवाब मलिक म्हणाले की, 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर केली होती. नोटाबंदीमुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडेल. काळा पैसा, बनावट नोटा संपुष्टात येतील असा दावा करण्यात येत होता. नोटाबंदी झाल्यानंतर देशातील विविध भागात बनावट नोटा सापडल्या. मात्र महाराष्ट्रात 8 ऑक्टोबर 2017 पर्यंत बनावट नोटांचे एकही प्रकरण समोर आली नव्हेत. 8 ऑक्टोबर 2017 रोजी मुंबईतील बीकेसीमध्ये छापेमारी झाली. त्यात 14 कोटी 56 लाखांच्या बनावट नोटा सापडल्या. मात्र हे प्रकरण दाबून टाकण्यास देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली. बनावट नोटांचा धंदा देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणाखाली चालत होता, असा दावा मलिक यांनी केला.



हे प्रकरण एनआयएकडे का सोपवले नाही ?
ते पुढे म्हणाले की, या प्रकरणामध्ये मुंबईतून एका व्यक्तीला अटक झाली. तर पुण्यातही एकाला अटक करण्यात आली. इम्रान आलम शेख असे यामध्ये अटक झालेल्या एका व्यक्तीचे नाव होते. याप्रकरणी नवी मुंबईतही अटकेची कारवाई झाली. पण 14 कोटी 56 लाख किमतीच्या बनावट नोटांचे हे प्रकरण 8 लाख 80 हजार रुपयांच्या बनावट असल्याचे दाखवून दाबले, असा आरोप मलिक यांनी केला. हे बनावट नोटांचे प्रकरण एनआयएकडे का सोपवले गेले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !