तंत्र-मंत्राद्वारे पैसे दुपटीच्या आमिषाने चुंचाळेतील तरुणाने पाच लाखात गंडवले : आरोपीला अखेर बेड्या


A young man from Chunchale Swindled five lakhs with the lure of doubling the money through tantra-mantra: The accused was finally arrested यावल : तंत्र-मंत्राव्दारे पैशांचा पाऊस पाडतो व पैसे दुप्पट करून देतो असे सांगत चुंचाळेतील भामट्याने साधूची वेशभूषा बदलून कापूरवाडी येथील एकाची पाच लाखात फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच सांगली पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने तालुक्यातील चुंचाळे येथील दिनेश पाटील याला अटक केल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

इस्लामपूरा पोलिसात गुन्हा दाखल
चुंचाळे, ता.यावल येथील दिनेश बाळू पाटील या तरुणाचा शोध घेत इस्लामपुरा पोलीस ठाणे जिल्हा सांगली येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे हे आपल्या पथकासह यावल येथे दाखल झाले. यावल पोलिस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे, हवालदार नरेंद्र बागुले, शामकांत धनगर, अनिल पाटील, निलेश वाघ आदींन्या पहाटेच्या सुमारास चुंचाळे गावातून दिनेश पाटील याला अटक केली व इस्लामपुरा पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

साधूची वेषभूषा धारण करीत फसवणूक
आरेापी तरुणाने साधुची वेशभूषा बदलून आपण तंत्रविद्या जाणून आहोत, असे सांगत पैशांचा पाऊस पाडतो व पैसे दुप्पट करून देतो असे सांगत कापुरवाडीतील रहिवासी पांडुरंग शिवराम सावंत यांची पाच लाखात फसवणूक केली. ही घटना शनिवार, 3 डिसेंबर रोजी सायंकाळी घडली होती. या प्रकरणी इस्लामपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

असा घडला गुन्हा
कापूरवाडी, ता.वाळवा, जि.सांगली येथील पांडूरंग सावंत याला दिनेश पाटील (रा.चुंचाळे) याने आपले नाव गणेश गिरी महाराज (उज्जैन) असे सांगत आपण पैशाची विधिवत पूजा घालून रक्कम दुप्पट करून देतो, असे आमिष दाखवले होते व शनिवार, 3 डिसेंबर रोजी त्याने आजचा मुहूर्त आहे तुम्ही सहा लाख रुपये तयार ठेवा असे सांगितले मात्र पांडुरंग सावंत यांच्याकडे केवळ पाच लाख रुपये होते. दिनेश पाटील हा त्यांच्या घरी जावुन पैसे व पूजेला साहित्य घेत पूजा करू लागला व सावंत कुटुंबास एका खोलीत थांबवत जो पर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत बाहेर येवु नका अन्यथा पूजा भंग होईल, असे म्हणाला. नंतर पैसे घेवून तो पसार झाला.

दोन्ही गुन्ह्यात सीसीटीव्हीमुळे दिनेश सापडला
दिनेश पाटील हा होमगार्ड सेवेत होता व या पूर्वी सेवेत असतांना यावल पोलिस ठाण्यात बैल चोरीच्या गुन्ह्यात किनगावातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात तो दिसून आल्याने त्यास अटक करण्यात आली. नंतर त्यास होमगार्ड सेवेतुन निलंबीत करण्यात आले होते आता देखील तो इस्लामपुरा पोलिसांना सीसीटिव्हीत दिसल्यानंतर पथक चुंचाळेपर्यंत पोहोचले.