प्राथमिक शिक्षणात नाविन्यपूर्ण बदल गरजेचे ! चाळीसगावला प्रबोधन मेळावा

योगेश अग्रवाल यांना केले हितगूज

0

चाळीसगाव : मराठी माध्यमातून सेमी इंग्रजी वर्तूळात असणार्‍या मराठी शाळांपुढे मोठी आव्हाने उभी असून पटसंख्या टिकविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांची पेरणी करावी लागेल. याव्दारे पालकांचा विश्वास संपादन करता येईल. यासाठी काळानुरुप शिक्षकांनी अपडेट असले पाहिजे, असे हितगूज चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाचे उपाध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी येथे केले. गुरुवारी संस्थेच्या व्ही. एच. पटेल प्राथ. विद्यालय, श्याम भगवानदास अग्रवाल बालकमंदिर, आनंदा सुपडू वाणी शिशू विकास मंदिर शाळांच्या शिक्षक प्रबोधन मेळाव्यात ते बोलत होते.

यांची विचार मंचावर उपस्थिती
विचार मंचावर शाळा समितीचे अध्यक्ष जितेंद्र वाणी, सदस्य रवींद्र राजपूत, मुख्याध्यापिका मंजूषा नानकर, ज्येष्ठ उपशिक्षक जिजाबराव वाघ आदी उपस्थित होते.

सकारात्मक बदलामुळे पालकांचा ओढा वाढला
अग्रवाल यांनी सांगितले की, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीला शिक्षणाची शतकोत्तर परंपरा आहे. आ.बं.मुली-मुलींच्या विद्यालयात गत दोन वर्षात नवनवीन उपक्रम राबविले. उत्तर महाराष्ट्रातील पहिली मॅथलब साकारली. विषयवार अद्ययावत दालने तयार केली. प्रजासत्ताक व स्वातंत्र्यदिनाचे सोहळे लोकाभिमूख केल्याने पालकांचा शाळेकडे ओढा वाढला. अशाच प्रकारचे सकारात्मक बदल याशाळेत झाले पाहिजे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जितेंद्र वाणी यांनी आपल्या मनोगतात उल्लेखनीय बाबी सांगून उणीवांचाही उहापोह केला. मंजूषा नानकर यांनी शाळा स्तरावर सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. पालकांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल माध्यमाचा प्रभावीपणे वापर होऊ शकतो, असे जिजाबराव वाघ यांनी सांगितले. यावेळी उल्लेखनीय उपक्रम राबविणा-या शिक्षकांचे कौतुक करण्यात आले.

अमृत पर्वणीसाठी आजचं सिद्ध व्हा !
व्ही.एच.पटेल प्राथमिक विद्यालयास प्राथमिक शिक्षणाची 68 वर्षाची मोठी परंपरा आहे. 2006 मध्ये शाळेचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला आहे. 2031 मध्ये शाळेचा अमृत महोत्सव असून शिक्षकांनी येत्या 7 वर्षात विद्यार्थी विकासाचे नवोन्मेषी माडेल तयार करुन त्या वाटेवर आगेकूच करावी. जेणेकरुन शाळेचा नाव – लौकीक उंचावेल. याअमृत पर्वणीसाठी आजच संकल्पबध्द व्हा, असे आवाहनही याप्रसंगी योगेश अग्रवाल यांनी केले.


कॉपी करू नका.