नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूक : सत्यजीत तांबेंची विजयाच्या दिशेने वाटचाल


Nashik Graduate Constituency Election: Satyajit Tambe on his way to victory नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरू असून तीन फेर्‍याअंती सत्यजीत तांबे आघाडीवर असून, ते विजयी होतील असे चित्र आहे. दरम्यान, निवडणुकीत विजयी झाल्यानंतरही विजोयोत्सव साजरा न करण्याचे सत्यजित तांबे यांनी कार्यकर्त्यांना ट्वीटद्वारे आवाहन केले आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात रंगलं नाट्य
विधान परीषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत नाट्य रंगलं होते. याठिकाणी काँग्रेसनं विद्यमान आमदार सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देत त्यांची उमेदवारी घोषित केली. त्यानंतर सुधीर तांबे मुलासह विभागीय कार्यालयात पोहचले. त्याठिकाणी सुधीर तांबे यांनी अर्ज न भरता सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत असताना या सर्व घडामोडी घडल्या त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला.

भाजपाची भूमिका राहिली निर्णायक
त्यानंतर काँग्रेस हायकमांडनं पक्षशिस्त भंग केल्याप्रकरणी तांबे पिता-पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. या निवडणुकीत भाजपाची भूमिका निर्णायक ठरली. भाजपाने निवडणुकीत कुणालाही उमेदवारी दिली नाही. मतदानाच्या दिवशीपर्यंत भाजपाने अधिकृत पाठिंबा जाहीर केला नाही. मात्र पडद्यामागून सत्यजित तांबे यांच्या विजयासाठी भाजपा प्रयत्नशील होती असं म्हटलं जाते. त्यात महाविकास आघाडीने याठिकाणी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना समर्थन दिले होते. त्यामुळे सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात लढत होती. सध्या मतमोजणीत सत्यजित तांबे आघाडीवर आहेत. सत्यजित तांबेंचा विजय जवळपास निश्चित असल्याचं बोलले जात आहे.

विजयाच्या समीप मात्र आनंदोस्त्सव साजरा करणार नाही
सत्यजित तांबे यांनी निवडणुकीतची मतमोजणी सुरू असताना केलेले ट्वीट चर्चेत आले आहे. आपण विजयाच्या अगदी जवळ आहोत, पण विजयोत्सव साजरा करणार नाही, माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही. सर्व सहकार्‍यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा. मी 3 ते 7 फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये, ही विनंती. दरम्यान, या अगोदर सत्यजित तांबे यांनी ट्वीटरवर मानस पगार याच्यासोबतचा फोटो शेअर करत, भावपूर्ण श्रद्धांजलीही अर्पण केली आहे. भावपूर्ण श्रद्धांजली, माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे. असे सत्यजीत तांबेंनी ट्वीट केलं आहे.

 


कॉपी करू नका.