जळगावातील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.प्रताप जाधव यांचे कर्करोगाने निधन


जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून कर्करोगाशी लढा देत असलेल्या जळगावा शहरातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.प्रताप दत्तात्रय जाधव यांची शुक्रवारी रात्री झुंज थांबली. वयाच्या 59 व्या वर्षी कर्करोगाच्या दीर्घ आजाराने शुक्रवार, 7 जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

गोरगरीबांचा डॉक्टर हरपला
मूळचे फुपनगरी, ता. जळगाव येथील रहिवासी असलेले डॉ. जाधव यांनी यांनी 1989 मध्ये एम. एस. आर्थोची पदवी मिळवली. त्यानंतर 1993 मध्ये त्यांनी जळगावात रुग्ण सेवा सुरू केली. सामाजिक क्षेत्रातील योगदान पाहता तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलवर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. वैद्यकीय सेवेसह डॉ. जाधव यांचे सामाजिक कार्यातही मोठे योगदान होते. जळगाव जनता बँकेच्या संचालक पदावर ते कार्यरत होते. अभिनेता नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम’ संस्थेवरही त्यांनी काम केले होते तसेच जळगावात मतीमंद मुलांसाठी असलेल्या ‘आश्रय माझे घर’ या उपक्रमातही त्यांचा सक्रीय सहभाग होता. 15 वर्ष रोटरी ईस्टचे सदस्य तसेच केशवस्मृती प्रतिष्ठानच्या कार्यात त्यांचा व्यापक सहभाग होता. गोरगरीबांचा डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती.

गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाच्या आजाराशी झुंजत होते मात्र शुक्रवार, 7 जुलै रोजी रात्री त्यांची खाजगी रुग्णालयात प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परीवार आहे.

दुपारी अंत्यसंस्कार
डॉ.प्रताप जाधव यांचे पार्थिव शनिवारी सकाळी त्यांच्या मालती अ‍ॅक्सीडेंट हॉस्पिटल येथील भास्कर मार्केट समोरील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. येथूनच दुपारी चार वाजता त्यांची अंत्ययात्रा निघेल आणि वैकुंठ धाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

 


कॉपी करू नका.