जळगावातील समता नगर भागात तीन घरांना आग
जळगाव : शहरातील समतानगर भागातील वंजारी टेकडीवरील घरांना अचानक आग लागल्यानंतर आगीत पार्टीशनचे तीन घरे जळाली. ही घटना गुरुवार, 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत साहित्य जळाल्याने रहिवाश्यांचा संसारच उघड्यावर आला. या घटनेत दोन लाखांपर्यंतचे नुकसान झाले.
तीन घरे जळाली
समतानगर भागातील वंजारी टेकडीवर अनेक पार्टीशनची घरे आहेत. याठिकाणी गुरुवार, 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. स्थानिक रहिवाश्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र सर्वच घरं पार्टीशनची असल्याने आग आटोक्यात येऊ शकली नाही. नागरीकांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिल्यानंतर काही वेळातच अग्निशमन विभागाचे पथक दाखल झाले. एका बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आली मात्र तोपर्यंत तीन पार्टीशनची घरं व घरांमधील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. या आगीत रवींद्र चव्हाण, समाधान चव्हाण, धुडकू चव्हाण यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. रामानंद नगर पोलिसांनी देखील माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली होती.


