20 हजारांची लाच मागणी भोवली : शिरपूर प्रांताधिकार्‍यांच्या वाहनावरील चालकासह खाजगी पंटर जाळ्यात

नाशिक एसीबीच्या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ


20,000 bribe demanded : Private punter with driver in Shirpur district official’s vehicle शिरपूर : गौण खनिजाची वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली परत देण्याच्या मोबदल्यात 20 हजारांची लाच खाजगी पंटरांमार्फत मागणार्‍या शिरपूर प्रांताधिकार्‍यांच्या वाहनावरील चालकाला नाशिक एसीबीने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही कारवाई बुधवार, 28 रोजी सायंकाळी करण्यात आली. मुकेश अरविंद विसपुते (35, रा.7 बी, विमल नगर, शिंगावे शिवार, शिरपूर) असे अटकेेतील शासकीय वाहन चालकाचे तर बॉबी उर्फ प्रशांत लोटन सनेर (50, प्लॉट नंबर 39, शाहू नगर, धुळे देवपूर) असे खाजगी पंटराचे नाव आहे.

लाच मागणी करणे भोवले
शिरपूरातील 33 वर्षीय तक्रार यांचे ट्रॅक्टर व ट्रॉली वाळू या गौणखनिजाची वाहतूक करताना गौणखनिज पथकाने पकडली होती. प्रांताधिकार्‍यांशी जवळीक असून वाहन सोडण्यासाठी 20 हजार रुपये लागतील, अशी मागणी 26 फेब्रुवारी रोजी खाजगी पंटर प्रशांत सनेर यांनी केली होती. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदवली मात्र सापळ्याचा संशय आल्याने लाच स्वीकारण्यात आली नाही मात्र पडताळणीत लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने खाजगी पंटर प्रशांत सनेर व प्रांताधिकार्‍यांच्या शासकीय वाहनावरील चालक मुकेश विसपुते यांना नाशिक एसीबीने बुधवारी सायंकाळी अटक करीत धुळे एसीबीच्या ताब्यात दिले. शिरपूर शहर पोलीस स्टेशनला संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
नाशिक एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप बबन घुगे, पोलीस नाईक गणेश निंबाळकर, पोलीस शिपाई नितीन नेटारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


कॉपी करू नका.