मद्य धोरण प्रकरण : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक


Liquor policy case: Delhi Chief Minister Arvind Kejriwal arrested दिल्ली : मद्य धोरण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ईडीने गुरुवार, 21 मार्च रोजी संध्याकाळी निवासस्थानातून अटक केल्यानंतर देशात खळबळ उडाली आहे. दरम्यान, केजरीवाल यांनी ईडी लॉकअपमध्ये रात्र काढल्यानंतर आज शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत असून आप पार्टी केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आंदोलन करणार आहे.

समन्सला गैरहजेरी अखेर अटक
गुरुवारी, 21 मार्च रोजी दुपारी 2.30 वाजता उच्च न्यायालयाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली. चौकशीसाठी ईडी कार्यालयात गेल्यास अटक केली जाणार नाही, असे आश्वासन केजरीवाल यांनी न्यायालयाकडे मागितले होते. केजरीवाल यांना ईडीसमोर हजर राहावे लागेल, त्यांच्या अटकेला स्थगिती नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

ईडी घेणार रीमांड
शुक्रवारी केजरीवाल यांना उच्च न्यायालयात हजर केले जाणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे हजर होण्यापूर्वीच त्यांचे मेडिकल केले जाऊ शकते. केजरीवाल यांचा रिमांड मिळविण्यासाठी ईडी प्रयत्न करणार आहे. दिल्लीच्या मंत्री आतिशी म्हणाल्या की, केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री राहतील. तुरुंगातून ते सरकार चालवतील. दरम्यान, गुरुवारी रात्री 11.50 वाजता ईडीच्या मुख्यालयात आणण्यात आले. रात्री 12 वाजल्यानंतर आरएमएल रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक अरविंद केजरीवाल यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ईडी कार्यालयात पोहोचले.

2873 कोटींचे नुकसान
मद्य घोटाळ्यात आतापर्यंत सहा आरोपपत्र दाखल असून केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर ते या घोटाळ्यातील 32 वे संशयित आरोपी आहेत. मद्य धोरणामुळे 2873 कोटींचे नुकसान झाले असून दक्षिण भारतातील मद्य व्यावसायीकांना फायदा व्हावा म्हणून त्या मोबदल्यात शंभर कोटींची लाच स्वीकारण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे.


कॉपी करू नका.