भुसावळात सलग तिसर्‍या दिवशी गावठी कट्ट्यासह आरोपी जाळ्यात

जंक्शन शस्त्र तस्करीचे केंद्र : जळगाव गुन्हे शाखेची कारवाई


For the third consecutive day in Bhusawal, the accused along with Gavathi Kattya are in the net भुसावळ : भुसावळ शहरात सलग तिसर्‍या दिवशी गावठी कट्ट्यासह दोन आरोपींना पकडण्यात आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीचे एकीकडे वारे वाहत असताना शहरात सातत्याने गावठी कट्ट्यांसह आरोपी सापडत असल्याने जंक्शन शहर शस्त्र तस्करीचे केंद्र तर नाही ना ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. भुसावळ बाजारपेठ हद्दीत सलग दोन दिवस कारवाई झाल्यानंतर भुसावळ तालुका पोलीस ठाणे हद्दीत गुरुवारी दोघांना गावठी कट्ट्यासह पकडण्यात जळगाव गुन्हे शाखेला यश आले. किशोर रामप्रसाद दायमा (22) व योगेश डिगंबर तायडे (25, झेडटीएस, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
झेडटीएस भागात दोघे संशयित गावठी पिस्टलाच्या धाकावर दहशत निर्माण करण्यासाठी पिस्टल बाळगून असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने गुरुवार, 21 मार्च रोजी दुपारी दोघा संशयितांना अटक केली. संशयितांकडून 20 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला. ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, जळगाव गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार किशोर राठोड, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, सचिन महाजन आदींच्या पथकाने केली.

तीन दिवसात तीन कट्टे जप्त
सोमवारी रात्री पावणेबारा वाजता बाजारपेठ हद्दीतील पांडुरंग टॉकीजजवळील इंडिया बॅटरी दुकानासमोर संशयित रणजीत किशोर चंडाले (37, बात्तर खोली, वाल्मीक नगर, भुसावळ) याच्याकडून 25 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व पाचशे रुपये किंमतीचे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले होते तर गंगाराम प्लॉटजवळील सदानंद डेअरीजवळ मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या मनीष उर्फ मिठ्या रवींद्र ठाकूर (23, गंगाराम प्लॉट, भुसावळ) यास जळगाव गुन्हे शाखेने गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसासह पकडले होते तर गुरुवारी पुन्हा तालुका हद्दीत दोघा आरोपींना गुन्हे शाखेने गावठी कट्ट्यासह पकडले.


कॉपी करू नका.