रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून उद्योजक श्रीराम पाटील प्रबळ दावेदार : राष्ट्रवादी सुप्रीमोंच्या निर्णयाकडे लागले लक्ष


Entrepreneur Shriram Patil is a strong contender from Mahavikas Aghadi for Raver Lok Sabha : Attention is being paid to the decision of the Nationalist Supremes भुसावळ : लोकसभा निवडणुकीचा एकीकडे आखाडा तापला असताना भाजपाने जळगावसह रावेरसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतरही महाविकास आघाडीकडून मात्र अद्यापही उमेदवारांची निश्चिती होत नसल्याचे चित्र आहे. दोन्ही जागांवर तगडे व तूल्यबळ उमेदवार देण्यात वेळ जात असताना या जागांवर आता नेमकी संधी कुणाला मिळणार ? याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. रावेर लोकसभेसाठी अ‍ॅड.रवींद्र पाटील व भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे नाव चर्चेत असताना दोन दिवसांपूर्वी रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील यांनी मुंबईत राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. बुधवारी मुंबईत पक्षाची पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होत असून त्यात उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, मराठा समाजाचा आश्वासक चेहरा, उद्योजक व राजकारणी अशी ओळख असलेल्या श्रीराम पाटील यांना राष्ट्रवादीने मैदानात उतरवल्यास चुरस आणखीनच रंगतदार होईल, असे राजकीय समीक्षकांना वाटते.

भाजपाकडून प्रचाराला वेग मात्र आघाडीचा उमेदवार ठरेना
रावेर मतदार संघात भाजपने पक्षाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना तिसर्‍यांदा संधी दिल्यानंतर त्यांनी प्रचारात वेग घेतला आहे मात्र महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवारी निश्चित होत नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला रावेरची जागेवर तुल्यबळ उमेदवार देण्याच्या विचारात आहे. भाजपाच्या बालेकिल्ल्यात आता राष्ट्रवादी कुणाला मैदानात उतरवून लढत रंगतदार बनवणार ? याकडे राजकीय समीकक्षांचे लक्ष लागले आहे.

भुसावळचे माजी आमदार चौधरीही दावेदार
भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी मुंबईहून परतल्यानंतर पक्षाने आपल्याला उमेदवारी दिल्याचा शब्द सांगत शक्तीप्रदर्शनही केले तर महिला प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी पदाधिकार्‍यांसह पुण्यात शरद पवार व जयंत पाटील यांची भेट घेऊन रवींद्र पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी केल्याने दोन प्रबळ दावेदार समोर आले मात्र आता दोन दिवसांपूर्वीच रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील यांना पक्षाने उमेदवारीबाबत विचारणा केल्याने सारेच संभ्रमात आहेत. सोमवारी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उद्योजक श्रीराम पाटील यांनी भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

रावेरची उमेदवारी आज होणार निश्चित
बुधवार, 27 मार्च रोजी मुंबई प्रदेश कार्यालयात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नियुक्त पार्लिमेंटरी बोर्डाच्या सदस्यांची बैठक होत आहे. या बैठकीत रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीतर्फे (शरद पवार गट) उमेदवाराचे नाव निश्चित होणर आहे. त्यात प्रबळ दावेदारांपैकी आता नेमकी कुणाला संधी मिळते ? याकडे मतदारांसह राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.


कॉपी करू नका.