नवापूर तहसीलदारांसह निवासी नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

प्रतिबंधात्मक कारवाईसाठी तीन हजारांची लाच भोवली : वर्षभराच्या तपासाअंती कारवाई


Navapur Tehsildar along with Resident Naib Tehsildar in ACB network नंदुरबार  : प्रतिबंधात्मक कारवाईसाठी 13 लोकांकडून तडजोडीअंती सुरूवातीला सात हजार व नंतर तीन हजार रुपये घेताना नवापूरातील खाजगी पंटराला नंदुरबार एसीबीने पकडले होते मात्र एसीबीच्या चौकशीत लाच रक्कम मागणीसाठी नवापूर तहसीलदार महेश कौतीकराव पवार व निवासी नायब तहसीलदार जितेंद्र जयसिंग पाडवी यांनी प्रोत्साहन दिल्याने त्यांना बुधवार, 27 मार्च रोजी अटक करण्यात आली. या कारवाईने नवापूर तहसीलमधील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

असे आहे लाच प्रकरण
विसरवाडी पोलिसात एका प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर 13 लोकांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रकरण नवापूर तहसीलमध्ये पाठवण्यात आले. खाजगी पंटर हनु रामा वळवी याने तहसीलमध्ये फौजदारी लिपिक असल्याचे भासवत प्रत्येकी एक हजारांची मागणी तक्रारदारांकडे केल्यानंतर दहा हजारात तडजोड झाली व सात हजार रुपये आगावू घेण्यात आले. 2 नोव्हेंबर 2023 रोजी हा प्रकार घडल्यानंतर तक्रारदारांनी उर्वरीत तीन हजार लाच मागणीबाबत 9 नोव्हेंबर 2023 रोजी तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला व वळवी यास 21 नोव्हेंबर 2023 रोजी अटक करण्यात आली.

लाचेला अधिकार्‍यांचे प्रोत्साहन
एसीबीच्या तपासात खाजगी पंटराला लाच मागणे व स्वीकारण्यासाठी नवापूर तहसीलदार महेश कौतीकराव पवार व निवासी नायब तहसीलदार जितेंद्र जयसिंग पाडवी व फौजदारी लिपिक अमृत चंद्रसिंग वळवी यांचे प्रोत्साहन असल्याचे स्पष्ट झाल्याने तहसीलदार पवार, निवासी तहसीलदार पाडवी यांना अटक करण्यात आली तर अमृत वळवी मात्र पसार झाला आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई नाशिक पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी, पोलीस निरीक्षक माधव वाघ आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.