बोदवड उपसा सिंचन योजनेच्या पंपगृहाचा स्लॅब कोसळला

निकृष्ट कामाचा आरोप : बहुजन मुक्ती पार्टीची चौकशीची मागणी


बोदवड : बोदवड उपसा सिंचन योजने अंतर्गत सुरू असलेल्या पंपगृह 1 ब चे काम प्रगतीपथावर असताना पंपगृहाचा स्लॅब निकृष्ट कामामुळे कोसळल्याने खळबळ उडाली आहे. निकृष्ट कामाची चौकशी करावी तसेच ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावे, अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य संघटक प्रमोद सौंदळे यांनी कार्यकारी संचालक यांच्याकडे केली आहे. पंप गृहाचे काम सन 2019 मध्ये सुरू झाले होते. कामावरील ठेकेदार वारंवार बदलण्यात आलेल्यान विना अनुभवी ठेकेदारांमुळे पंपगृहाचे काम हे मागील सहा वर्षांपासून रेंगाळत आहे.

निकृष्ट कामामुळे स्लॅब कोसळला
पंपगृहाच्या निकृष्ट कामाबाबत परिसरातील विविध सामाजिक व राजकीय संघटना वारंवार आंदोलने निषेध करत आहे. त्यातच चार दिवसांपूर्वी पंपगृह 1ब च्या स्लॅब चे काम प्रगतीपथावर असतान स्लॅब कोसळला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी केंद्र शासनाच्या अखत्यारीत येणार्‍या एवढ्या मोठ्या हजारो कोटींच्या महत्वकांक्षी प्रकल्पाचा स्लॅब कोसळणे ही गंभीर बाब आहे. स्टील बांधणी सुरू असताना आधी व नंतर विभागीय अधिकार्‍यांकडून वारंवार घटनास्थळाची प्रत्यक्षात पाहणी न करता केवळ अहवालाचे कागदोपत्री घोडे नाचवले जातात त्यामुळे हा स्लॅब कोसळण्याचा भयावह प्रकार बोदवड उपसा योजनेच्या पंपगृहामध्ये घडल्याचा आरोप आहे.

ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी
स्लॅब कोसळण्याचे मुख्य कारण म्हणजे संबंधित महातज्ञ पर्यवेक्षक अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केलेली नाही शिवाय ठेकेदारांच्या माणसांच्या भरोशावर हे काम सोडल्यामुळे संबंधित ठेकेदाराने स्टील बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आधी आडवे बीम काँक्रीटने भरणे अंदाजपत्रकानुसार बंधनकारक होते त्यानंतर स्लॅब भरणे गरजेचे होते परंतु संबंधित ठेकेदाराने एकाच वेळेस बीम व स्लॅब भरण्याचा प्रयत्न केल्यामुळे ओल्या काँक्रिटचे मटेरियल ओझे थातूरमातूर पद्धतीने लावलेल्या सपोर्टिव्ह पाईपला न झेपल्यामुळे हा स्लॅब कोसळला. बोदवड उपसा सिंचन कोसळलेल्या स्लॅबची संपूर्ण चौकशी होऊन संबंधित ठेकेदाराला तात्काळ ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे कार्यकारी संचालक यांच्याकडे करण्यात आली आहे.


कॉपी करू नका.