यावल नगरपालिकेत विस्तारीत भागातील नागरीकांचे निवेदन

नाले सफाईची व ढापे दुरुस्ती केली मागणी


यावल : यावल नगरपालिकेत विस्तारीत भागातील नागरिकांनी निवेदन देत विस्तारीत भागातील आयेशा नगरात मस्जिद जवळील नाला सफाई तसेच याच भागात नादुरुस्त ढापे दुरुस्तीची मागणी करण्यात आली. मुस्लिम समाज बांधवाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे मात्र अस्वच्छ नाल्यामुळे मशिदीसह परिसरात दुर्गंधी पसरत आहे.

दुर्गंधीमुळे आरोग्य आले धोक्यात
यावल नगरपालिकेत बुधवारी अशपाक शहा गफ्फर शहा, सोहल रुबाब पटेल सह नागरीकांनी कक्ष अधीक्षक आरती खाडेे यांच्याकडे निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की, नगरपरिषद हद्दीत विस्तारीत भागात आयेशा नगर आहे. येथे मशिदीजवळ नाला आहे. या नाल्यात मोठ्या प्रमाणात घाण-कचरा साचला आहे. त्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरते. यातच सध्या मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. नमाज अदा करणे, रोजा इफ्तार करणे या करीता मशिदीमध्ये मोठ्या संख्येत नागरीक येतात मात्र मशिदी शेजारील नाल्यातून येणार्‍या दुर्गंधीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याच परिसरात जागोजागी गटारीवर असलेले ढापे तुटले आहे . तत्काळ नालेसफाई व ढापे दुरूस्त व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

फवारणी करण्याची मागणी
नालेसफाई केल्यानंतर तत्काळ विस्तारीत भागात डासांचा वाढलेला प्रार्दुभाव रोखण्याकरीता कीटक, मच्छर, डास नाशक फवारणी करावी, अशी देखील मागणी करण्यात आली आहे.


कॉपी करू नका.